शहरात दोन्ही राजांच्या प्रचाराचा नारळ फुटला
सातारा : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले तर सातारा विधानसभेसाठी शिवेंद्रराजे भोसले यांनी आज शक्तीप्रदर्शन करत संकल्प रॅलीद्वारे अर्ज दाखल केले. तत्पूर्वी जलमंदिर ते पोवई नाक्यादरम्यान भव्य रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांसह काढलेल्या या रॅलीत चंद्रकांतदादा पाटील आणि कांताताई नलावडे यांच्यसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या रॅलीने भाजपच्या गोटात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. विधानसभेच्या आखाडयात शिवेंद्रराजे भोसले हे नाव सातारा जावली मतदार संघासाठी अंतिम झाल्याने सातार्यात पुन्हा राजेशाही निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे या जागेसाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले एकत्र अर्ज दाखल करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी आधीच केली होती. त्यानुसार सकाळी 11 पूर्वी साताराचे ग्रामदैवत ढोल्या गणपती येथे दर्शन घेवून आल्यानंतर उदयनराजे जलमंदिर आले. तेथून सुरुचीवर जावून शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. यानंतर दोघेही राजवाड्यासमोर मिरवणुकीसाठी सज्ज ठेवलेल्या वाहनात दाखल झाले. यावेळी गांधी मैदान, राजवाडा परिसरात अलोट गर्दी झाली होती. एकच आवाज उदयन महाराज, बाबाराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांच्या गजरात तसेच पारंपरिक वादे आणि हलगी तुतार्यांच्या निनादात रॅली पोवई नाक्याकडे रवाना झाली. हजारो कार्यकर्ते पायी तर तसेच मोटार बाईकवरून रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दोन्ही राजे ठिकठिकाणी नागरिकांना अभिवादन करत असताना मार्गक्रमण करू लागली. कमानी हौदावरून रॅली शेटे चौक, पोलिस मुख्यालय मार्ग पोवई नाक्याकडे आली. उददयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यासमवेत ना. चंद्रकातदादा पाटील, कराड दक्षिणचे भाजपाचे उमेदवार अतुल भोसले, रिपाइंचे अशोक गायकवाड उपस्थित होते. तसेच रॅलीत भाजपाचे नगसेवक, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
रॅली पोवई नाक्यावर आल्यानंतर शिवतिर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर सर्वजण पायी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. याठिकाणी पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दाखल केला. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. तोपर्यंत शिवेंद्रराजे प्रांत कार्यालयाकडे रवाना झाले. अर्ज दाखल करून उदयनराजेही चंद्रकांत दादांसह तातडीने प्रांत कार्यालयाकडे रवाना झाले. याठिकाणी शिवेंद्रराजे यांनी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे अर्ज भरला. यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील, उदयनराजे भोसले वेदांतिका राजे भोसले नीता केळकर विक्रम पावसकर यांची उपस्थिती होती.
चौकट- सातारा येथे टोलनाका आणि त्यानंतर सुरूची येथे शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे यांच्या गटात जोरदार धुमश्चक्री झाली होती. टोलनाक्यावरील राड्यानंतर उदयनराजेंचे कार्यकते सुरुचीत येवू लागताच शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सुरुची येथे गोळीबारही झाला होता. तसेच गाड्यांची मोडतोड झाली होती. त्या राड्यानंतर आज प्रथमच उदयनराजे भोसले सुरुची बंगल्यावर आले होते.
विधानसभेच्या आठ जागा जिंकणार
रॅलीत लोकांचा जोश पाहिला, लोकांना दोन्ही राजे एकत्र येण्याची इच्छा होती आता सातार्याचा विकास अत्यंत गतीने होणार. सातारा विधानसभा मतदार संघाच्या आठही जागा आम्ही खात्रीने जिंकू असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवेंद्र राजे भोसले यांचा फॉर्म भरल्यानंतर केला. युती म्हणजे अॅडजस्टमेंट असते, भाजपच्या पहिल्या यादीत दिग्गजांची नावे नाहीत याकडे लक्ष वेधल्यावर चंद्रकांत दादा म्हणाले यादी हे विभागानुसार व कामगिरीवर जाहीर होते यामध्ये काही तांत्रिक अडचणं असेल मी मिरवणुकीत असल्याने मी ती पाहिली नाही. आपल्या पुणे (कोथरूड) येथील उमेदवारीबाबत म्हणाले मी काही बाहेरचा नाही मी 1982 पासून विद्यार्थी परिषदेचा सक्रिय सदस्य असताना पुण्यात काम केले आहे. मी काही बाहेरचा नाही माझी बायको पुण्यायीच आहे मी पुण्याचा जावई आहे 1995 पासून मी पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे त्यात पुणे शहर येते त्यामुळे पुण्यात घरटी ओळख असल्याने उमेदवारीची चिंता नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सातारा जावली मतदारसंघातील मतदार राजाचा आशिर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे आहे. संकल्प रॅलीत कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने आले आहेत त्यांचा उत्साह बघूनच सातारा जावली विधानसभा मतदार संघाचा निकाल काय आहे मी वेगळे सांगायला नको. सातारा व जावली या दोन्ही तालुक्यांनी मला सतत साथ दिली आहे. त्यामुळे येथील विकास हेच माझे लक्ष्य सातत्याने राहणार आहे.
विराट शक्ती प्रदर्शनाने सातार्यात दोन्ही राजेंचा अर्ज दाखल
RELATED ARTICLES