मात्र अनेक नगरसेवकांनी प्रचाराला दांडी मारल्याची चर्चा
सातारा : सातारा शहरात उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे महायुतीचा जोर दिसत असला तरी प्रचारातून अनेक नगरसेवक गायब असल्याचे दिसून आले आहे. सातारा विकास आघाडीच्या बावीस पैकी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके नगरसेवक वगळता दोन डझन नगरसेवकांनी प्रचाराला दांडी मारल्याची चर्चा आहे. त्या तुलनेत आमदार गटाच्या प्रचारात स्थानिक पातळीचा नगरसेवक प्रचारात सहभागी असला पाहिजे यामुळे नगर विकास आघाडीकडून नागरिकांशी थेट संवाद सुरू आहे. त्या धर्तीवर आपआपल्या भागातील पदयात्रा व कोपरा सभा वगळता नगरसेवकांनी ऐन इलेक्शनच्या गडबडीत सुट्टी काढल्याची शंका येऊ लागली आहे.
गेल्या अडीच वर्षात सातारा शहरात झालेल्या विकास कामांचा जाहीरनामा सातारकरांपर्यंत घेऊन जाण्यात नगरसेवकांचीच टाळाटाळ असल्याने नेत्यांच्या धडाकेबाज प्रचाराची अडचण झाली आहे. एरव्ही जलमंदिरला लुडबुड करणारे मेहेरबान वॉर्डात दिसण्याच्या ऐवजी गायब झाल्याने सातार्यात महायुतीचा प्रचार एकसंघ पणे सुरू आहे असे म्हणणे धाडसाचे ठरले आहे. भाजपच्या निष्ठावंतांना सूचना आल्याप्रमाणे त्यांनी उदयनराजे भोसले यांना संलग्न करून घेतले आहे. पण पालिकेत हक्काने पदाधिकारी म्हणून मिरवणारे व खुर्चीतून गमजा करणारे काही बहाद्दर प्रचारातून गायब असल्याचे उदयनराजे भोसले यांच्या कोअर कमिटीच्या लक्षात आले आहे. त्यावर रामबाण उपाय योजण्याची रणनीती रजताद्रीच्या वॉररूम मधून आखली जात आहे.
विधानसभेचा पेपर शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी सोपा नसला तरी उदयनराजे भोसले यांना लोकसभेचे रणांगण प्रतिष्ठित मतांच्या अंतराने राखावे लागणार आहे. त्यासाठी किमान आधारभूत कार्यक्रम व राजेंच्या विजयाबद्दल आत्मविश्वास देणारी कार्यकर्त्याची फळी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. उदयनराजे यांच्याकडे तब्बल बावीस नगरसेवक आहेत. अगदी पाच सहाजण वगळता इतर दोन डझन नगरसेवक मात्र आदेश आल्याशिवाय नाही या पध्दतीने वागत आहे. सातारा शहराची लोकसंख्या तब्बल 1 लाख 27 हजा र53 इतकी आहे त्या मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहचणे आवश्यक असताना नगरसेवकांची राजकीय मरगळ संपले नसल्याची तक्रार आहे.
चौकट-2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवेंद्र राजे भोसले यांना उपनगरांच्या तुलनेत सातारा शहरातूनच कमी मतदान झाले होते. मताधिक्य घटल्याने शिवेंद्रराजेंच्या अडचणी वाढल्या होत्या. तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात नरेंद्र पाटील यांनी पावणेपाच लाख मते घेतली. अगदी सातारा शहरातील आमदार बहुल वॉर्डातून त्यांना मताधिक्य मिळाले होते. मात्र सातारकरांची ही नाराजी एकत्रितपणे भरून काढण्याची संधी असताना सातारा विकास आघाडीची प्रत्यक्ष रणांगणावरची नगरसेवकांची प्रचार यंत्रणा सातार्यात दिसेनाशी झाली आहे. या सर्व गोष्टी शांतपणे टिपण्याचे काम उदयनराजे भोसले यांच्याकडून सुरू आहे. नंतर सगळे हिशोब यथावकाश मांडले जातील असे सध्याचे त्यांचे समीकरण आहे.
उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे शहरात महायुतीचा प्रचाराला जोर
RELATED ARTICLES