Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीघरकुल योजनेच्या सहीचा राजकीय खेळ

घरकुल योजनेच्या सहीचा राजकीय खेळ

दबावाच्या काहिलीने भाऊसाहेब घामाघुम, पालिकेत बडया धेंडांचा ओव्हर टेंडरिंगचा धडाका
सातारा : जिल्हयात लोकसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसलेला असताना सातारा पालिकेत पंतप्रधान आवास योजनेत ओव्हर टेंडरिंगचा खेळ रंगू लागला आहे. आता वर्क ऑर्डर अंतिम झाली असून माजगावकर माळाला नव्या घरकुलांची प्रतिक्षा आहे. मुख्य अभियंत्याची टिप्पणी बदलून त्यावर सही करण्यासाठी टोकाचा राजकीय दबाव टाकणे सुरू झाल्याने बांधकाम विभाग ग्रीष्माच्या काहिलीत हुडहुडला आहे.
भाऊसाहेब पाटील यांना मेडिकल बोर्डाच्या तंदुरूस्ती प्रमाणपत्रासाठी नोटीस निघाल्याने पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या 205 कोटीच्या टेंडरवरून सुरू झालेले राजकारणं आता मतभेद आणि नियमबाह्य कारभाराच्या वळणावर येऊन ठेपले आहे. प्रोसेंडिंग पूर्ण नसताना ती पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणेची झालेली घाई, सात मार्चच्या सभेत तडकाफडकी देण्यात आलेली मंजूरी, मुख्य अभियंत्यांच्या अहवालाशिवाय मंजूर झालेली प्रक्रिया आणि सातार्‍यातील राधिका रोडवरील एका हॉटेलमध्ये कॅमेरे बंद करून झालेली तातडीची बैठक या घटनांचा क्रम जुळवला तर सातार्‍यात भाजप ने प्रस्तुत केलेल्या महत्वाकांक्षी योजनेची राष्ट्रवादीने पध्दतशीर खिचडी शिजवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निविदा प्रक्रियेमध्ये कमी दराच्या निविदा या अंतिम केल्या जातात. मात्र पंतप्रधान आवास योजनेमध्ये माजगावकर माळावरील शासकीय जमिनीवर टप्प्याटप्याने दोन हजार सदनिका बांधल्या जाणार आहेत. 2300 रुपयांची कमी दराची निविदा असताना 2400 रुपयांची निविदा मंजूर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नगर पालिका अधिनियम 1965 धाब्यावर बसवून पालिकेत नियमबाह्य ओव्हरटेंडरिंगचा खेळ सुरू आहे हे या प्रकरणावरून स्पष्ट झाले असून यामध्ये सत्ताधारी आघाडीतील नेत्यांच्या मर्जीने चालणार्‍यांनी टोकाचा इंटरेस्ट दाखवला आहे.
चौकट- कळीचे नारदं आणि राजकीय नाटय
या संपूर्ण प्रकरणात मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी तटस्थ न राहता राजकीय दबावापुढे मान तुकवल्याची चर्चा आहे. म्हणजे ती इतकी की मुख्य अभियंत्यांची फेर टेंडरची टिप्पणी बदलून राजकीय दृष्टया सोयीची टिपणी सादर करण्यात कोणतीच हयगय दाखवण्यात आली आहे. ओव्हर टेंडरिंगचा हा मामला प्रशासकीय दृष्टया अडचणीचा असल्याने मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी सहीचा हात आखडता घेतला. त्याआधीच सरावाच्या कंत्राटी अभियंत्यांनी सकतीचा अज्ञात वास पत्करला. तर राजकीय दबावाच्या जाचाने भाऊसाहेब पाटलांनी आजारपणाचे कारण देऊन दीर्ध सुट्टीचा पवित्रा घेतला. मात्र तीन दिवसा पूर्वी हजर झालेल्या भाऊसाहेबांना तीन दिवसांचे काम नामंजूर करून मेडिकल बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी नोटीस काढण्यात आली. पुन्हा राजकीय दबावाचे छळसत्र सुरूच राहिल्याने बांधकाम विभाग पुन्हा मेटाकुटीला आहे. त्यामुळे मुख्य अभियंत्यांना वगळून राज्य संवर्गातील अभियंत्यांनी कागदे रंगवायची आणि कामे कंत्राटी अभियंत्यांनी करायची असा भन्नाट मार्ग शोधण्यात आला आहे. राजकीय छळवाद संपला नाही तर पुन्हा रजेवर जाण्याचा मनसुबा बांधकाम विभागाने बोलून दाखवला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular