Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात उदयनराजे भोसलेंची हॅट्रीक

सातार्‍यात उदयनराजे भोसलेंची हॅट्रीक

सातारा : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात शानदार हॅट्रिक नोंदवत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सव्वा लाखाच्या मताधिक्याने पुन्हा दिल्ली गाठली. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांचा एक लाख नऊ हजार बारा मतांनी पराभव करत सातार्‍यात आपलीच कॉलर टाईट असल्याचे उदयनराजे यांनी दाखवून दिले. डाऊन झालेला सर्वर इटीबीपीएसची मते मोजण्यास झालेली अडचण यामुळे प्रत्यक्षात मतमोजणी आठच्या ऐवजी साडेआठ वाजता झाली.
लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री. छ. उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? की, माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे भूमिपुत्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे कमळ फुलवणार? याकडे सातारा जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. एमआयडीसीच्या फेडरेशन गोडाऊनमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक रंजन झा व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत सहा विधानसभा मतदारसंघ निहाय एकशे वीस टें बलावर मतमोजणी प्रक्रियेला सुरवात झाली. पहिल्या अर्धा तासातच पहिल्या फेरीत उदयनराजे यांनी साडेचार मतांचे लीड घेतले मात्र सर्वर डाउन असल्याने निकाल प्राप्त होण्यास विलंब होत होता . पहिल्या चार फेर्‍यामध्ये पोस्टल व ईटीबीपीएसची मते मोजण्यात आली तेव्हा राजेंची पाटलांवर साडेसहा हजार मतांची आघाडी होती. नंतरच्या दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ फेर्‍यांमध्ये ती आघाडी दहा हजार तीस हजार साठ हजार अशी वाढत जाऊन सायंकाळी पाचनंतर मताधिक्क्याने एक लाख दहा हजार मतांचा आकडा ओलांडला आणि राजेंची सीट कन्फर्म असे म्हणत राजे समर्थकांचा सातार्‍यात जल्लोष सुरू झाला . सातारा शहरात दुपारी फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू झाली. भाजपचे मिशी बाज उमेदवार नरेंद्र पाटील हे सुध्दा सकाळच्या सत्रात दोन तास तळ देऊन होते. सातारकरांच्या साथीने मी परिवर्तन घडवणार असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला. पहिल्या चार तासात जे पंधरा हजार मतांचे उदयनराजे यांचे जे मताधिक्य होते ते आपण सहज मोडू अशा अविर्भावात पाटील होते पण राजेंनी मताधिक्क्यात सगळ्याच फेर्‍यांमध्ये जी गती पकडली त्यानंतर मागे वळून बघितलेच नाही. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला हादरे बसत असताना सातार्‍यात उदयनराजे यांच्या करिष्म्याने राष्ट्रवादीची पत वाचली. जो चमत्कार भाजपने महाराष्ट्रात घडवला तो मात्र सातार्‍यात घडू शकला नाही . सहा विधानसभा मतदारसंघात फेरीनिहाय उदयनराजे यांना 5 47796 तर भाजपच्या नरेंद्र पाटील 436762 इतकी मते मिळाल . तब्बल 111034 मतांची आघाडी घेत उदयनराजे यांनी खासदारकी तिसर्‍यांदा खिशात घातली . राजे समर्थकांनी जल्लोषात जल मंदिरकडे धाव घेतली. मात्र दुष्काळामुळे हारतुरे न स्वीकारण्याच्या सूचना राजेंनी आधीच दिल्या होत्या. मात्र प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जल मंदिर वर गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना निकाल लागलाय आता एकेकाला बघून घेतो असा गर्भित इशारा प्रतिक्रिया देताना दिला. पुन्हा निवडून दिल्याबद्दल त्यांनी सातारकरांचे आभार मानले. भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी सुध्दा समस्त सातारकरांचे आभार मानतं आपल्याला हा जनादेश मान्य असल्याचे स्पष्ट केले.
सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते . माढयात रणजितसिंह निंबाळकर यांनी बावन्न हजार मतांनी विजय नोंदवत चमत्कार घडवला .पवारांच्या माढयात भाजप ने कमळ फुलवण्यात यश मिळवले . महाराष्ट्रासह देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले तब्बल तिसर्‍यांदा सातारा लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक करण्याच्या तयारीत होते .परंतू युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनीही त्यांना निवडणुकीत कडवी लढत दिली. सातारा लोकसभा मतदारसंघातून शेवटपर्यंत भाजप व शिवसेना युतीला तुल्यबळ असणारा उमेदवार मिळत नव्हता. सातारा लोकसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. शेवटी राष्ट्रवादीतून कोलांटउडी घेवून भाजपात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने शिवबंधन बांधून उमेदवारी दिली. कराड दक्षिण व पाटण तालुक्याच्या जोरावर नरेंद्र पाटील यांनीही जोरदार मुसंडी मारत सातारा जिल्ह्यात प्रचारयंत्रणा राबवली. मात्र, वाढलेले नवीन मतदान विद्यमान खासदार उदयनराजे यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. उदयनराजेंनी युतीची उमेदवारी घ्यावी, अशी इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. यासाठी खास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांनीही खास फिल्डिंग लावली. मात्र राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या शिष्टाईमुळे यांच्यामुळेच उदयनराजेंनी राष्ट्रवादीतून सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गेल्या निवडणुकीत खा. उदयनराजे सुमारे पावणे चार लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र विकासाचे मुद्द्यावर विरोधकांनी खा. उदयनराजेंना खिंडीत गाठले. विरोधकांच्या प्रभावी प्रचारयंत्रणेमुळे या निवडणुकीत उदयनराजेंना प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र शिवछत्रपतींचे वंशज आणि सातारा लोकसभेत वाढलेले नवीन मतदान हे उदयनराजेंसाठी जेमेचे बाजू असणार आहेत. शेवटी फैसला मतदार राजाने घेत उदयनराजे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ घातली.
माढा लोकसभेची निवडणूक यावेळी हाय व्होल्टेजफ झाली. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत माढा हा नवीन मतदारसंघ जन्मास आला. पक्षांतर्गत बंडाळ्या टाळण्यासाठी आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ बारामती सोडून माढ्यातून लढण्याचा निर्णय घेतला. माढा मतदारसंघात असलेल्या राष्ट्रवादीच्या प्राबल्यामुळे 2009 सालच्या निवडणुकीत भाजपच्या सुभाष देशमुख यांना चारीमुंड्या चित करत खा. शरद पवार माढा मतदारसंघातून सहजपणे निवडून आले. परंतू 2014 च्या निवडणुकीत खा. पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी या जागेवरुन माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली. मात्र, ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे असलेल्या सदाभाऊ खोत यांनी कडवी झुंज दिली. शेवटी सदाभाऊ खोत यांचा निसटता पराभव झाला व विजयसिंह मोहिते- पाटलांना खासदारकीची लॉटरी लागली. परंतू 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी दहा वर्षानंतर माढ्याच्या आखाड्यात पुन्हा शड्डू ठोकला. परंतू माढ्याचे गणित आपले राजकारण संपवू शकते, ही भीती मनात निर्माण झाल्यामुळे तसेच फलटणच्या सभेत रामराजे नाईक निंबाळकर साक्षीने घेण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माण-खटावमधील राष्ट्रवादीचे तथाकथित नेते शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्याचा अपशकुन मानून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली.
शेवटी राष्ट्रवादीतून माढ्यातून कोण लढणार, यासाठी उमेदवारांची चाचपणी झाली. शेवटी भाजपचेच टेकू असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना ओढून ताणून उमेदवारी देण्यात आली. इकडे भाजपनेही फिल्डिंग लावली. थेट सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच भाजपने गळाला लावले. माण-खटावमधून आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे, माळशिरसमधून विजयसिंह मोहिते-पाटील, करमाळ्यातून आ. नारायण पाटील, धनगर नेते उत्तमराव जानकर अशा दिग्गजांची मोट बांधून भाजपनेही राष्ट्रवादीची पारंपारिक माढ्याची गढी काबिज करण्यासाठी फिल्डिंग लावली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला विरुद्ध भाजपची मुसंडी, असे चित्र निवडणूक प्रचारादरम्यान माढा मतदारसंघात दिसत होते. भाजपची राजकीय गणिते अचूक ठरली. रणजितसिंह भोसले यांचे बोराटवाडीचे परमस्नेही आमदार जयकुमार गोरे यांनीही टाकलेला राजकीय डाव यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले . माढ्याची गढी भाजप ने संधी साधून भुईसपाट केली .राष्ट्रवादी राखणार, की भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर ही गढी काबिज करणार, याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शरद पवारांसह फलटण नरेशांचे राजकारणही माढ्याच्या निकालावर अवलंबून आहे. मात्र कोण कोणाला आस्मान दाखवतंय, हे उद्या रात्री उशिरापर्यंत सस्पेन्स कायम होता. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे राष्ट्रवादीने पत राखली मात्र थोरल्या पवारांचा मतदारसंघ भाजप ने बळकावत येथे पक्की राजकीय मांड ठोकली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular