बँकेचा नामविस्तार, संकेतस्थळाचे उद्घाटन व डिजीटल बँकींग सुविधेचा सातार्यातील शानदार कार्यक्रमात प्रारंभ
सातारा : पुणे कमर्शिअल बँक या नव्या नावाबरोबरच ग्राहकसेवेचे उल्लेखनीय कार्य करणारी पूर्वाश्रमीची शिवनेरी बँक सहकार क्षेत्रात नावलौकीक पटकावेल, असा आशावाद व्यक्त करून अडचणीत आलेल्या अशा बँकांसाठी शिवनेरीच्या धर्तीवर तिसरा पॅटर्न राबवणार असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे संचालक व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सतीश मराठे यांनी व्यक्त केले आहे.
बँकेचा नामविस्तार व संकेतस्थळाचे उद्घाटन, डिजीटल बँकींग सुविधेचा प्रारंभ नुकताच सातार्यात पुष्कर हॉलमध्ये संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांदक, संचालक डॉ. किशोर केला यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मराठे म्हणाले की, विविध कारणांनी अडचणीत येणार्या वित्तीय संस्था एकतर बंद पडतात, किंवा इतरत्र विलीन तरी होतात. मात्र त्यासाठी तिसरा पर्याय म्हणून शिवनेरी सहकारी बँकेच्या धर्तीवर व्यवस्थापन बदलासह काही विशेष योजना आखून अशा बँक़ांना बळ देता येईल. त्यासाठी या संदर्भातील एक प्रस्तावही लवकरच आपण मांडणार आहोत. कायापालट झालेल्या या बँकेने ग्राहकाभिमुख सेवा, स्वच्छ कारभाराच्या जोरावर यशाची नवनवी शिखरे गाठावीत.
बुलढाणा अर्बनप्रमाणेच सहकारक्षेत्रात आदर्शवत काम करून पुणे कमर्शिअल बँकेने ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा द्यावी. आजवरचा अनुभव लक्षात घेता नवे रूप प्राप्त केलेली ही बँक निश्चीतच यशस्वी ठरेल, असा आशावाद ना. चरेगावकर यांनी या वेळी व्यक्त केला.
बुलढाणा अर्बनचे कुटूंबप्रमुख राधेश्याम चांडक यांनी त्यांच्या भाषणात पालक या नात्याने सदैव पुणे कमर्शिअल बँकेला आपली बहुमोल साथ राहिल, असे सांगितले. तसेच पूर्वीच्या ग्राहकांबरोबच नव्या ठेवीदारांनीही या बँकेत नि:संकोचपणे ठेवी ठेवाव्यात व बँकींग सेवा- सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी प्रस्ताविकात बँकेच्या नामांतराची भूमिका आणि आगामी ध्येयधोरणांचा आढावा घेतला.
महाराष्ट्र सहकार परिषदेच्या राज्यस्तरीय समितीवर अध्यक्षम्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व राज्यमंत्री दर्जा प्राप्त अभ्यासू बँकींग तज्ज्ञ ना. शेखर चरेगावकर याच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्यरत असून विविध सहकारी संस्थांना येणार्या अडी- अडचणींवर मात करण्यासाठी समन्वय, मार्गदर्शन आणि सुकर वाटचालीचा मार्ग दाखवण्याचे काम करते, असे श्री. देशपांडे यांनी या वेळी सांगितले. अनिरूध्द दडके यांनी सूत्रसंचालन, तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील यांनी आभार मानले. बँकेचे उपाध्यक्ष विजयराव चव्हाण यांनी गायलेल्या पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमास बँकेचे सभासद, ग्राहक, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, व्यापारी, उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे कमर्शिअल बँक नावलौकीक मिळवेल : मराठे
RELATED ARTICLES

