निधी खर्चाच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही
– पालकमंत्री विजय शिवतारे
सातारा : सन 2019-20 करीता जिल्हा नियोजन समितीकडून वार्षिक योजनांसाठी मंजूर 344.59 कोटींच्या कामांच्या आराखड्यातील कामे करण्यास सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक मंजूरी प्राप्त करुन घेऊन प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करावेत, यात दिरंगाई करणार्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदीवासी क्षेत्रबाह्य उपयोजनांची नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजय शिवतारे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या 28 डिसेंबर 2018 रोजीच्या झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास चर्चेद्वारे मान्यता देण्यात आली. पालकमंत्री विजय शिवतारे पुढे म्हणाले, संबंधित यंत्रणांनी मंजूर निधीमधील कामे करण्यासाठी तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेसाठीची कार्यवाही तात्काळ करणे अपेक्षित आहे. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा अंमलबजावणी अधिकार्यांनी करावा.जिल्हा नियोजन समितीने मंजूर कामे वेळेत पूर्ण न झाल्याने निधी खर्च होत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या विकास कामावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी लागणारी कार्यवाही विहीत वेळेत करुन कामे पूर्ण करावीत, तसेच निधीही वेळेतच खर्च करावा. यात दिरंगाई दाखवणा-या संबंधित अधिकार्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. तसेच प्रसंगी अधिकार्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री विजय शिवतारे आज यांनी यावेळी दिले.
राज्याचे माजी मंत्री कै. यशवंतराव मोहिते यांच्या स्मारकाचा प्रस्ताव
राज्याच्या विकासात ज्यांचे मोठे योगदान राहिले आहे, अशा कै. यशवंतराव मोहिते यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून त्यांच्या रेठरे या गावी स्मारक व्हावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगावला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती असलेल्या प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव असलेल्या भोसरे या गावांना शासनाने ब वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला. त्याबद्दल नितिन बानगुडे पाटील यांनी शासन, पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्याला यावेळी मान्यता देण्यात आली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून मांडण्यात आलेल्या घाटाईदेवी आणि करहर या धार्मिक स्थळांच्या पर्यटनाच्या दर्जात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठविण्याच्या ठरावास यावेळी मंजूरी देण्यात आली.
जिल्हाधिकार्यांच्या कामाचे झाले कौतुक
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी चारा छावणीसाठी अतिशय चांगले काम केल्यामुळे माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील जनावरांच्या चार्याची समस्या मिटली असल्याचे सांगून आ. जयकुमार गोरे यांनी या कामाचे कौतुक केले.
सन 2019-20 साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 265 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 77.65 कोटी, आदीवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेतंर्गत 1.94 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. या वेळी विविध विभागांनी सादर केलेल्या प्रस्तावास सभागृहाकडून मान्यता देण्यात आली. या बैठकीस विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी 22 जून 2018 रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीतील इतिवृत्तावरील कार्यवाहीची उपस्थित सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजनची मंजूर कामे वेळेतच पूर्ण करा
RELATED ARTICLES

