Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमहसूल खात्याच्या मेहरबानीने वाई तालुक्यातील वाळू माफिया मोकाट

महसूल खात्याच्या मेहरबानीने वाई तालुक्यातील वाळू माफिया मोकाट

धनदांडग्याची मुजोरी नद्यांच्या मुळावर, पाणी मारून वाळूची विक्री
वाई : वाईच्या कृष्णा नदीत बेसुमार मातीमिश्रीत वाळू उपसा महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे राजरोसपणे चालू आहे. रात्रीच्या वेळी अतिशय शिस्तबध्द पद्धतीने हा वाळू उपसा महसूल विभागाच्या मदतीने चालू आहे. त्यामुळेच कोणाचीही तमा न बाळगता अवैध पणे दररोज हजारो बरास वाळू उपसा करण्यात येत आहे. याकडे या विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास कृष्णा नदीचे पात्र बदलतय कि, काय अशी अवस्था सध्या कृष्णा नदीची झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत प्रशासन अडकल्याने त्याचाच फायदा उठवीत धनदांडग्यानी वाई च्या कृष्णा नदीत बेसुमार वाळू उपसा चालू आहे, कृष्णा नदीच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे काम वाळू माफियांकडून सध्या वाई तालुक्यात दुर्दैवाने चालू असल्याचे दिसत आहे. नागरिकांमधून अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. एकंदरीतच महसूल विभागाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वाईला दक्षिण काशी तर कृष्णा नदीलादक्षिणेकडील गंगा म्हणून तिची संपूर्ण देशात ओळख आहे. परंतु महसूल खात्याच्या भ्रष्ट कारभारामुळे ठेकेदाराच्या संगनमताने कृष्णा नदीत बेसुमार वाळू उपसा करण्यात येत आहे. सकाळी साडेपाच च्या दरम्यान पसरणी घाटातून पाणी मिश्रित वाळूची वाहतूक बिन्दास्तपणे चालू असते. ज्या ठिकाणी वाळूवर पाणी मारले जाते अशा ठिकाणी जमिनीचा कस निघून जाईल कि काय अशी अवस्था त्या ठिकाणची झालेली असते. नदीच्या पात्रात मोठ-मोठाले खड्डे पडून नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नदी काठावर राहणार्‍या लोकांच्या जीविताला यामुळे धोका निर्माण झाला आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीचा प्रवाह बदलतोय की-काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाई परिसरात भद्रेश्वर पुलापासून ते वाकेश्वर पर्यंत हा अवैध वाळू उपसा चालू आहे. व काठावरच मातीमिश्रीत वाळू धुवून गाडीत भरली जाते. वाळूवर प्रचंड पाणी मारल्याने ग्राहकांची दिशाभूल करण्याचा नवा फंडा या वाळूमाफियांकडून तयार करण्यात आला आहे. नदीतील वाळू प्रमाणापेक्षा जास्त उपसल्याने महसूल विभागाची हजारो बरास वाळू चोरीला जावून लाखो रुपयांचे नुकसान महसूल खात्याच्या भ्रष्ट अधिकार्यांमुळे सध्या शासनाचे चालू आहे. वाईच्या प्रांत व तहसीलदार हे नवीन येवूनही कारभारात काहीही फरक पडलेला नाही.हात ओले होत असल्याने त्यांचे या वाळू माफियांकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. वाई शहरातून जाणार्‍या कृष्णा नदीला अक्षरशः वाळू माफियांनी पोखरून काढले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण सुध्दा करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक संघटना महसूल विभागाला जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.
संथ वाहते कृष्णा माई, स्वच्छ वाई सुंदर वाई हे फक्त पुस्तकातच वाचावे लागणार अशी काहीशी परिस्थिती नदी पात्रात झाली आहे, तिची ओळखच आता पुसणार कि-काय अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली असताना.त्याकडे संबंधित खात्यांचे दुर्लक्ष होणे ही तालुक्याच्या महसूल खात्याचा अनागोंदी कारभाराचा उत्तम नमुना आहे. नदीपात्रात दिवसा गाढवाच्या मदतीने बेसुमार वाळू उपसा केला जातो. तर रात्रीच्या वेळी यंत्राच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळूची चोरी महसूल खात्याच्या मेहरबानीने करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील विविध ठिकाणी वाळूने भरलेल्या ट्रक वरती कारवाई करण्याचे नाटक करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम बेधडक पणे संबंधित खात्याचे चालू आहे. पोकलेन व जेसीपी मशीनच्या सहाय्याने वाळू उपसा केल्याने धोम धरण ते ओझर्डे घाट पर्यंत नदी पात्रात जागो-जागी सात-आठ फुटांचे खड्डे तयार झाले आहेत. गतवर्षी गंगापुरी घाटावर प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केल्याने नदीपात्रात असणारा ब्रिटीश कालीन पाण्याच डोह नामशेष होण्याच्या मार्गावर होता. तर पाण्यात माती मिसळल्याने वाईकरांना अनेक दिवस गढूळ पाणी प्यावे लागले होते. पाण्यात असणारे मासे व इतर जलचर प्राण्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदी पात्रालगत काही धन दांडग्यानी अतिक्रमण सुध्दा संबंधित खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे करण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होणे हि अतिशय दुर्दैवाची बाब आहे. भ्रष्ट प्रशासनामुळे पैसेवाल्यांचे धाडस दिवसें-दिवस वाढतच चालले आहे. यावर तहसीदार खात्याने व धोम धरणाच्या पाटबंधारे खात्याने त्वरित कारवाई करून वाळू चोर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी व यात कोणाचे हात ओले झाले आहेत याचाही तपास करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. अतिक्रमण केल्याने कृष्णा नदीचा ओढा होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. हा प्रकार पाहून वाई तालुक्यात धनदांडग्याणी वाळू चोर ठेकेदारांनी आपले बस्तान भ्रष्ट अधिकार्यानमुळे घट्ट बसविल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. ही वाई तालुक्याच्या दृष्टीने अतिशय शरमेची बाब असून यावर त्वरित कारवाई करण्यासाठी वाईच्या पश्चिम भागातील स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अनेकजण आपल्या मनातील खदखद, संताप व्यत्क करताना दिसत आहेत. तरी महसूल विभागाने याची गंभीर दाखल घेवून संबंधितावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरत आहे.
वाईच्या कृष्णा नदीत अनेक ठिकाणी बेसुमार वाळू उपसा केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच प्रसंग नदीच्या काठावर राहणार्‍या नागरिकांच्या वाट्याला येण्याची संबंधित खाते वाट पाहताय-की- काय अशी विचारणा नागरिकांमधून करण्यात येत आहे.
सुज्ञ नागरिक (कृष्णा नदी प्रेमी)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular