सातारा : भिमा कोरेगाव येथे झालेल्या आंबेडकर अनुयायांवरील हल्ल्याबाबत आज सातारा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी सातारा जिल्हा बंद करून निषेध मोर्चाने आपले आंदोलन केले.
आज सकाळी सातारा शहरातील सातारा कोरेगाव रस्त्यावरील आर पी आय कार्यालयातून दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, रमेश विटकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भीमसैनिक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करीत होते. त्यानंतर सातारा शहरात आंदोलनाला सुरुवात झाली.
महाराष्ट्र बंद करण्यात आले होते, सातार्यात आर पी आय, भारिप-बहुजन महासंघ, रासप व विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.पण, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना या प्रमुख पक्ष रस्त्यावर उतरले नाहीत. त्यामुळे या पक्षाच्या मागासवर्गीय व दलित कार्यकर्त्यांना आंबेडकर अनुयायांच्या रोषालाही सामोरी जावे लागले.
सातारा जिल्ह्यातील बस, रिक्षा व खाजगी वाहतूक ठप्प झाली होती. अनेक शाळा, महाविद्यालयात विध्यार्थीची तुरळक उपस्थिती होती.
आज दिवसभर शिव प्रतिष्ठान चे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावे. त्यांना अटक करावी. भाजपा सोबत गेलेल्या मागासवर्गीय मतदार यांनी विचार करावा. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील जावळी, फलटण, वाई, कोरेगाव,।माण, खटाव, कराड, खंडाळा, महाबळेश्वर, पाटण, सातारा तालुक्यात सर्वत्र बंद पुकारण्यात आला होता.
भीमा कोरेगाव येथील दोन गटात झालेल्या संघर्षाचा निषेध करण्यासाठी बुधवारी दलित संघटनांकडून सातारा बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतूक तसेच शहरांतर्गत सुरू असणारी रिक्षा वाहतूक बुधवारी पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे शहरांतील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तसेच शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळेच प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सातार्यात पोवई नाक्यासह ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज दुपारी डॉ प्रकाश आंबेडकर यांनी सायंकाळी पाच वाजता बंद मागे घेतला जाईल असे जाहीर केले .
पाचगणी : पाचगणीतील व्यापार्यांनी बंदला प्रतिसाद देत आठवड्याचा बाजार असतानादेखील सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला . पाचगणी बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाकडून डिव्हीजन पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मेढा : मेढा बंदला प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध दलित संघटनांनी भीमा कोरेगाव घटनेचा निषेध केला.
फलटण : बंदला प्रतिसाद मिळाला. फलटणमध्ये कडकडीत बंद ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वडूज : शहरामध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला असून विविध संघटनांनी एकत्र येऊन वडूज शहरातून निषेध रॅली काढली.
शिवथर : भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवथर येथील दलित संघटनांनी रास्ता रोको केला.
कराड : कराडमध्ये हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कराडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हजारो कार्यकर्त्यांनी मुख्य बाजारपेठेतून जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढली. कॉटेज हॉस्पिटल कृष्णा नाका चावडी चौक दत्त चौक यामार्गे मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे काही काळ तणावाची परस्थिती निर्माण झाली होती. पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात होता.
सातारा : आनेवाडी टोल नाक्यावरील सन्नाटा
राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर आज सकाळ पासून सन्नाटा दिसून आला. एरवी सदैव वाहनांच्या रांगा लागून राहिल्यालेला आनेवाडी टोल नाक्यावर आज महाराष्ट्र बंदच्या हाकेने वाहनांची रेलचेल थांबलेली दिसून आली. ट्रक , ट्रेलर , तसेच अवजड वाहनांनी आज बंदमुळे नुकसान होण्यापेक्षा तोडफोडच्या बचावापासून स्वतः ची मुक्तता केली .
सातारा जिल्ह्यात आंबेडकर अनुयायांचे निषेध मोर्चाने आंदोलन ; बंद ला साताऱ्यात प्रतिसाद ; महाराष्ट्र बंद मागे
RELATED ARTICLES