सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोठया प्रमाणात निधी येत असतानाही नियोजनाच्या अभावामुळे निधीचा अपव्यय होत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारांनी एक वेळ भाजपला सत्ता द्यावी भाजप घराणेशाहीला पुरुन उरेल असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
साता-यात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ते आले होते. प्रचार रॅलीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, कांताताई नलावडे, भाजपचे पदाधिकारी, भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, अडीच वर्षापूर्वी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाली. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून दोन वर्षात राज्यातील दुष्काळ हटवला. देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे वचन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते त्यानुसार त्यांची वाटचाल सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शिवारात पाणी खेळवतो त्याप्रमाणे शिवारात पाणी आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता कमी प्रमाणात आहे परंतु या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना संधी आली असून त्यांनी भाजप उमेदवारांना मतदान करावे. भाजपची सत्ता आल्यास कोणताही टॅक्स न वाढवता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढवण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गळती आणि भ्रष्टाचार मोठया प्रमाणात आहे. निधी येत असूनही त्याचे नियोजन आणि वापर नीट नसल्याने निधीचा अपव्यय होत आहे. स्वच्छ प्रशासन देण्यासाठी भाजप कटिबध्द असून मतदारांनी बदलाच्या दिशेने मत द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. पाणी, कचरा, पार्किंग या समस्या सोडवण्यात येतील. कुठल्याही मेट्रो सिटीला लाजवेल अशी शहरे विकसित करण्यास भाजप कटिबध्द आहे. त्यामुळे मतदारांनी एक वेळ सत्ता द्यावी घराणेशाहीला पुरुन उरु असेही त्यांनी स्पष्ट केले. आर.पी.आय बरोबरच्या मतभेदाबाबत विचारले असता त्यांनी आमच्या घरातील भांडण असून ते मिटल्याचे सांगितले.