पाटण :- देशासह महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घालणा-या कोयना धरणाला ६० वर्षे पूर्ण झाली तरी या प्रकल्पामुळे देशोधडीला लागलेल्या व विकासाचे खऱ्या अर्थाने सैनिक असणाऱ्या कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची साडेसाती अजून संपली नाही. दरवर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस हा कोयना धरण ग्रस्तांच्या अश्रूंचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वसनाचे प्रश्न येत्या चार दिवसात सकारात्मक दृष्टीने शासन स्तरावर सोडवावेत याकामी जिल्हयातील सर्वच आजी माजी लोकप्रतिनिधींनी कोणतेही राजकारण न करता हा प्रश्न सोडविण्यासाठी संवेदनशीलता दाखवावी. चार दिवसात धरणग्रस्तांचे प्रश्नावर शासन स्तरावर बैठक झाली नाही तर होणा-या परिणामांस सरकार जबाबदार राहील असा शेवटचा इशारा धरणग्रस्तांचे नेते डॉ.भारत पाटणकर यांनी कोयना येथे दिला.
गेले ६० वर्षापासून विकसनशील पुनर्वसनापासून त्रस्त असलेल्या कोयनाधरणग्रस्तानी कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी ते बोलत होते.यावेळी कॉ.संपत देसाई ,हरिश्चंद्र दळवी ,चैतन्य दळवी ,बळीराम कदम ,महेश शेलार ,रमेश जाधव ,निवृत्ती कदम ,श्रीपती माने ,विठ्ठल सपकाळ शंकर देसाई ,सचिन कदम अर्जुन सपकाळ,संभाजी चाळके आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ.भारत पाटणकर पुढे म्हणाले की कोयना धरण ग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाचे आतापर्यंतच्या सत्तेत असलेल्या शासनाने वाभाडे काढले आहे.पुनर्वसनाच्या भळभळत्या जखमावर आश्वासनाचे मिठ चोळण्याचे काम केले आहे.कोयना धरणग्रस्तानी आजपासून या विरोधात चालु केलेले आंदोलन हे एक वादळ आहे.चार दिवसात या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवून प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेतली नाही तर या वादळाचे रुपांतर चक्रीवादळात होवून यात अनेकजण जमीनदोस्त होतील.यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नी प्रामाणिकपणा दाखवून हे प्रश्न निकाली काढावेत.
कोयना प्रकल्प एक पण फायदे अनेक असणारा प्रकल्प आहे.महानिर्मिती कंपनी ला हा फुकाचा प्रकल्प वाटत आहे.त्यामुळे शासनाने कोयना हा नक्की कशाचा प्रकल्प आहे हे जाहीर करून कोयना प्रकल्पग्रस्तांना साप्तपणाची वागणूक देणाऱ्या महानिर्मिती कंपनीचे कान ओढून कोयनेतुन निर्माण होणाऱ्या विजेचा शॉक देवून त्यांना भानावर आणावे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी काढलेला आदेश म्हणजे बोलाची कढी व बोलाचाच भात असून न झालेल्या आदेशाचे फलक लावून आब्रू काढणारे त्याचे काही कार्यकर्ते शत प्रतिशत खोटे आसल्याची टिका त्यांनी यावेळी केली.
या आंदोलनाला जिल्ह्य़ातील सर्व धरणग्रस्त संघटनांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला आहे.
कोयना धरणग्रस्तानी आज कोयनानगर शहरात विराट मोर्चा काढून कोयनानगर दणाणून सोडले.या मोर्चाला व ठिय्या आंदोलनाला हाजारो प्रकल्पग्रस्त महिला व पुरूष उपस्थित होते.
या मोर्चात व आंदोलनात जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील धरणग्रस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.