सातारा : येथील माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशनच्यावतीने जिल्हा रुग्णालयात गेल्या दहा वर्षांपासून अविरत अन्नदानाचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याला सलाम व त्यांच्या या कार्याची नोंद गिनीज बुक ऑफ वलर्ड रेकॉर्डस् मध्ये होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी अपेक्षा मसाप, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.
माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशनच्यावतीने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणा-या अन्नदानाच्या दशकपूर्ती सोहळयानिमित्त ते बोलत होते. व्यासपीठावर फौंडेशनचे अध्यक्ष माधव सारडा, वसंतराव फडतरे, राधेश्याम भंडारी, बन्सीलाल लढ्ढा, प्रमोद लाहोटी, नरेंद्र मिणीयार, विनोद राठी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, माहेश्वरी समाज हा समाजकार्यात अग्रेसर असतो. फौंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची जागतिक नोंद होऊ शकते यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याप्रसंगी त्यांनी जीवनाची सुंदरता व जीवन मूल्ये याविषयावर मनोगत व्यक्त करत फौंडेशनच्या भविष्यातील उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
फौंडेशनचे अध्यक्ष माधव सारडा यांनी मनोगतामध्ये गेल्या दहा वर्षाचा कार्याचा आढावा घेत फौंडेशनच्यावतीने राबवण्यात येणार्या इतर उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी भविष्यकाळात माहुलीतील दशक्रिया विधी परिसर सर्व सोयींनी युक्त करण्यासाठी दत्तक घेणार असून जिल्हा रुग्णालयातील अवयव दान करणा-या रुग्णांना परगावी न्यायचे झाल्यास त्यासाठी होणारा रुग्णवाहिकेचा खर्च संस्थेमार्फत केला जाईल असे जाहीर केले. यावेळी मान्यवरांचे आणि देणगीदारांचे सत्कार प्रा. मिलिंद जोशी, फौंडेशनचे अध्यक्ष माधव सारडा यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अन्नदाते गोपाळशेठ, सौ. कामाक्षी बर्वे, डॉ.शाम बडवे, डॉ. श्रीनिवासन यांनी मनोगत व्यक्त केले. या अन्नदान उपक्रमाचा लाभ घेतलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी पत्राव्दारे मनःपूर्वक दिलेल्या शुभेच्छा व शुभेच्छासंदेश कलाकार संतोष पाटील यांनी पोस्टमनच्या भूमिकेतून वाचून दाखवल्या. सूत्रसंचालन सौ.स्नेहल दामले यांनी केले तर आभार फौंडेशनचे सेक्रेटरी प्रमोद लाहोटी यांनी आभार मानले.
फौंडेशनच्या उपक्रमास सहकार्य करणार्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, डॉ.सौ. उज्जवला माने, जनता बँकेचे संचालक विनोद कुलकर्णी, गेली दहा वर्षे सातत्याने अतिशय उत्कृष्ट दर्जाचे जेवण देणार्या श्री मंगल महाराज श्रीनाथ केटरर्स यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच या सोहळयासाठी सहकार्य करणा-या सर्वांचे आभार फौंडेशनच्यावतीने मानण्यात आले.
यावेळी फौंडेशनचे संस्थापक संचालक बन्सीलाला लढ्ढा, खजिनदार नरेंद्र मिणीयार, संचालक राधेशाम भंडारी, विनोद राठी, दिलीप लोया, दीपक जाजू, प्रकाश मंडोरे, हरिनारायण कासट, राजेंद्र कासट, गोवर्धन सारडा, श्रीराम सारडा, जितेंद्र भंडारी, श्रीनिवास झंवर बहुसंख्य अन्नदाते व नागरिक उपस्थित होते.
माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशनची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी : प्रा. जोशी
RELATED ARTICLES