सातारा : पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावित असताना धारातीर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शशिकांत भोसले, प्रभारी पोलीस अधीक्षक (गृह) ए.डी. फडतरे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रभारी पोलीस अधीक्षक (गृह) ए.डी. फडतरे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, 31 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैनिकांनी आपल्या सिमेवर हल्ला केला होता. त्यावेळी केंद्रीय राखीव दलातील शिपायांनी धैर्याने लढा दिला होता. त्यामध्ये 10 भारतीय शिपाई शहीद झाले. त्याची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस स्मृती दिन पाळला जातो. यामध्ये गत वर्षभरात म्हणजेच गेल्या 1 सप्टेंबर ते यंदा 31 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस पाळला जातो. गेल्या वर्षभरात देशभरात 473 पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रथम संपूर्ण देशभरातील गेल्या वर्षभरात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले. संपूर्ण पोलीस दलाने उभे राहून मानवंदना दिली.
त्यानंतर पोलीस दलाने बंदूकीच्या तीन फैरी झाडून व पोलीस बिगुल वाद्य वाजवून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी नागरिक, सातारा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस जवांन मोठ्या संख्येने उपस्थित होते.