सातारा : सातारा जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरलेला ऐतिहासिक राजधानी महोत्सव गुरूवारपासून सुरू होत असून अजिंक्यतारा किल्ल्यावर या निमित्ताने साक्षात शिवकाल अवतरणार आहे. शस्त्रास्त्र प्रदर्शन, कला प्रदर्शन, तसेच तरूणाईला भावणारा युवा रॉक बँड आणि सातारा जिल्ह्याच्या योगदानात महत्वपुर्ण कार्य करणार्या गुणवंताचा सत्कार असे तीन दिवसाचे भरगच्च कार्यक्रम दि. 25 ते 27 मे दरम्यान राजधानी महोत्सवात होणार आहेत.
सातारा शहर हे कला गुणांचे केंद्र आहे. तरूणांच्या प्रतिभेला वाव मिळण्यासाठी राजधानी महोत्सव हे आदर्श व्यासपीठ ठरावे. याकरता सर्व सातारकरांनी या महोत्सवात सहभागी होऊन हा महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
उदयनराजे मित्र समुह सांस्कृतिक कला प्रतिष्ठान व पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस चालणार्या सातारा महोत्सवाच्या तयारीचा आढावा खा. उदयनराजे यांनी येथील शाहू स्टेडिअम आयोजित बैठकीत घेतला. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, ऍड. दत्ता बनकर, पक्षप्रतोद निशांत पाटील, सुनिल काटकर, सुजाता राजे-महाडिक, पंकज चव्हाण, बाळासाहेब गोसावी, उपस्थित होते.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा शहर हे कला संस्कृतीचे प्रमुख केंद्र आहे. तरूणाईला प्रत्येक वेळी प्रतिभा सिध्द करण्यासाठी पुण्या-मुंबईला जाण्याची गरज नाही. येथील कलाकारांच्या गुणांना वाव देणे हाच राजधानी महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये कोणताही राजकीय उद्देश नाही. तीन दिवस चालणार्या या महोत्सवाची जबाबदारी प्रत्येक सातारकरांवर आहे.
या महोत्सवाचा सर्वच नागरिकांनी मनापासून आस्वाद घेऊन खर्या अर्थाने या महोत्सवाला लोकाश्रय द्यावा ही आपली जबाबदारी आहे. यामध्ये कोणतेही गट-तट न ठेवता राजधानी महोत्सव यशस्वी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडल्यास या महोत्सवाला एक वेगळी उंची मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उदयनराजेंनी संयोजकांकडून तीन दिवस चालणार्या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर दि. 25 रोजी शिवजागर हा पोवाडे आणि मर्दानी खेळांचा कार्यक्रम सकाळी 9 वाजता उदयनराजे भोसले व संभाजी भिडे गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या महोत्सवात सातारकरांना शिवकाळाची अनुभूती देणारे देखावे उभारले जाणार असल्याचे पंकज चव्हाण यांनी सांगितले. दि. 26 रोजी युवागिरी नावाचा रॉकिंग बँड परफॉरर्मन्स् येथील शाहु स्टडिअम परिसरात होणार आहे. दि. 27 रोजी शाहु स्टेडिअम येथे संध्याकाळी 6 वाजता सातारा गौरव पुरस्कार दिले जाणार आहेत.
सातारकरांनी केवळ लावणीच्या कार्यक्रमाला न येता सर्वच कार्यक्रमांना हजेरी लावावी अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा मिश्किल दम उदयनराजे भोसले यांनी दिल्याने बैठकीच्या दरम्यान एकच हशा पिकला. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून संयोजकांनी सातारकरांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.