सातारा : सातारा पालिकेच्या नगराध्यक्षपदी आपल्याला सर्वसामान्य नागरीकांनी निवडून दिले आहे. परंतु पदभार स्वीकारल्यापासून आपण काम करण्यात दुजाभाव करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विरोधी नगर विकास आघाडीच्या कोेणत्याही नगरसेवकाचे काम नगराध्यक्ष करीत नाहीत. केवळ आश्वासनच देत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळ पुरस्कार समितीची बैठक 15 दिवसात घेवू असे आश्वासन नगराध्यक्ष माधवी कदम यांनी दिले होते. एक महिना झाला तरी बैठकीचे नियोजन नाही. सत्तारूढ सातारा विकास आघाडीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी विरोधी नगरस विकास आघाडीच्या वतीने दि. 20 फेब्रुवारीपासून बेमुदत चक्री उपोषण छेडले जाणार असल्याची माहिती नविआचे विरोधी नगरसेवक अमोल मोहिते यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
दिलेल्या पत्रकात नगरसेवक मोहिते यांनी नमुद केले आहे की, 1 जानेवारी 2018 रोजी नगर विकास आघाडीच्या वतीने गुलाबपुष्प देवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले होते. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी पंधरा दिवसात डॉ. नरेंद्र दाभोळकर पुरस्कार समितीची बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते. आश्वासनास महिन्याचा कालावधी गेला तरी अद्याप बैठक नाही. नगराध्यक्षांना आश्वासनांचा विसर पडलेला दिसत आहे. 2 फेब्रुवारी रोजी शहरातील बंद असलेल्या पथ दिवे तसेच पालिके समोरील उद्यानातील दिवे चालू करण्यासाठी कंदील अभिनव आंदोलन केले होते. पथदिव्यांसाठी आंदोलन करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
नगराध्यक्ष माधवी कदम या आश्वासन देण्यापलीकडे कोणतेही काम करीत नाहीत. सत्ताधारी विरोधकांच्या प्रभागातील कोणतीही कामे करीत नाहीत. विकास कामांमध्ये दुजाभाव केला जात आहे. नगराध्यक्ष हा शहराचा असतो. मात्र त्यांना त्याचा विसर पडलेला आहे. विरोधी नगरसेवकांची कामे डावलून त्यांना सापत्नीकपणाची वागणूक नगराध्यक्षकांकडून मिळत आहे. या निषेधार्थ दि. 20 फेब्रुवारीपासून चक्री उपोषण छेडले जाणार असल्याचे विरोधी नगरसेवक अमोल मोहिते यांनी पत्रकाव्दारे माहिती दिली.