सातारा : विविध मागण्यांसाठी निवेदने,लाक्षणिक आंदोलन करुनही कोणतीच कार्यवाही न केल्याने नगरविकास आघाडीच्यावतीने नगरपालिकेच्या मुख्य व्दारासमोर नगराध्यक्षांच्याविरोधात आणि सत्तारुढ सातारा विकास आघाडीच्याविरोधात मंगळवारपासून नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्या उपस्थितीत चक्री उपोषण सुरु करण्यात आले. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तसेच सातारा विकास आघाडीने दिखाऊपणा बंद करावा नाहीत सळो की पळो करुन सोडू असा इशाराही नगरसेवक अमोल मोहिते यांनी यावेळी दिला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार बैठक, साता-यातील विविध अंतर्गत रस्त्यांचे पॅचिंग, शहरातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट, अभयसिंहराजे उद्यानाची दुरावस्था,विरोधी नगरसेवकांची कामे न घेणे, वॉर्ड फंड खर्ची टाकण्यासाठी मान्यता न देणे असे प्रकार नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आणि सत्तारुढ सातारा विकास आघाडीकडून होत आहेत. ज्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासन कायदा केला त्यांच्याच शहरात त्यांच्या नावाने दिल्या जाणा-या स्मृती पुरस्काराची बैठक घेण्यासही राजकारणातून टाळाटाळ केली जात आहे. इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी याबाबत आणि इतर मागण्यांबाबत पुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी नगराध्यक्षांनी 15 दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दीड महिना झाला तरी याबाबत साधी बैठकही घेतली नाही. चांगल्या उपक्रमात राजकारण करण्याचे काम सत्ताधा-यांकडून होत आहे. नगरविकास आघाडीच्या सदस्यांची कामे घेतली जात नाहीत. आम्ही सुचवलेली कामे वैयक्तिक नसून जनतेचीच आहेत परंतु ती मंजूर केली जात नाहीत. अभयसिंहराजे उद्यानातील लाईटस बंद असून दुरावस्था झाली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी कंदील आंदोलनही करण्यात आले होते.
स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सत्तारुढ आघाडीने 1 कोटी रुपयांचा चुराडा केला आहे परंतु शहरात अस्वच्छता आहे. शहरवासियांना मूलभूत सुविधा देण्यास साविआ कमी पडत असून साधी साधी कामेही होत नाहीत आणि दुसरीकडे मात्र मोठ मोठया कामांच्या भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे. परंतु ही सर्व कामे मनोमिलनाच्या काळातील आहेत याचा त्यांना विसर पडला आहे. ही कामे मंजूर व्हावीत यासाठी आमचे नेते आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. कास धरण उंची वाढवण्याबाबत सांगायचे झाले तर त्यावेळेस सुजल निर्मल ही योजना शहरासाठी नव्हती. परंतु तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात त्यावेळी त्यांच्या दालनात बैठक झाली. त्यात कास रस्त्यावरील 15 गावांचा समावेश केला त्यामुळे ही कास धरण उंची वाढवणे योजना मंजूर होऊ शकली ही वस्तुस्थिती आहे. नगरसेवकांना दिला जाणा-या दहा लाख रुपयांच्या वॉर्ड फंडातून सुचवलेली कामेही घेतली जात नाहीत, त्यामुळे तो खर्च होत नाही. मनोमिलनाच्या काळात विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर, नगरसेवक कल्याण राक्षे यांनी सुचवलेली कामे मंजूर करुन ती केली जात होती. परंतु आताच्या सत्तारुढ साविआला विरोधकांनी सुचवलेली कामे ही जनतेचीच असतात याचा सोयीस्कररित्या विसर पडलेला आहे. या सगळया कारभाराविरोधात चक्री उपोषण सुरु केले आहे. सातारा विकास आघाडीची दिखाऊपणाची गडबड सातारकरांना कळत असून नुसती मोठ मोठी स्वप्ने दाखवायची पण करायचे काहीच नाही ही त्यांची पध्दत आहे.
उपोषणाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयाला अभिवादन करुन नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर चक्री उपोषण सुरु करण्यात आले. जोपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेऊन त्याच्यावर कार्यवाही आणि अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत चक्री उपोषण सुरुच ठेवणार असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी यावेळी दिला.
चक्री उपोषणात नगरविकास आघाडीचे सदस्य अमोल मोहिते, अशोक मोने, शकील बागवान, शेखर मोरे-पाटील, रवी ढोणे, नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, सोनाली नलावडे, मनिषा काळोखे, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, भालचंद्र निकम, सुनील जाधव, जगन्नाथ कीर्दत, भाग्यवंत कुंभार, सचिन सारस, बाळासाहेब भुजबळ, महेश जगताप, रामभाऊ नलावडे, राजू गोरे, अन्सार आतार, रवी माने, डॅनी पवार , महेश कुंभार, हेमंत कासार, विलास कासार आणि समर्थक सहभागी झाले होते.
दिखाऊपणा बंद करा नाहीतर सळो की पळो करुन सोडू : अमोल मोहिते
RELATED ARTICLES