पाटण दि. :- ( शंकर मोहिते ) – छत्रपती शिवकाळातील पाटण महालात प्रमुख असलेल्या सुंदरगडावर ( घेरादात्तेगड ) असलेल्या प्राचिन काळातील “गजलक्ष्मी तलवार” विहिरीच्या मधोमध दगडात कोरलेले शिवलिंग मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगावर श्रावणी सोमवार निमित्ताने पंचामृत दुग्धा अभिषेक, पुजा पाठ, महाआरती,भजन करून छत्रपती शिवभक-शिवमावळ्यांचा श्रावणी उत्सव उत्साहात साजरा होत असतो. या निमित्ताने सुंदरगडावरील “गजलक्ष्मी तलवार” विहिरीतील शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी होत असते. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
पाटण येथून जवळच असलेल्या सुंदरगडावर काळ्या कातळात खोदलेली भव्य “तलवार” आकाराची विहिरी आहे. या विहिरीतच मधोमध शंकराचे “शिवलिंग” असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी वर “गजलक्ष्मी” हत्ती कोरलेला आहे. यावरून या विहिरीला “गजलक्ष्मी तलवार विहिर” म्हणले जाते. या तलवार विहिरीच्या पात्यापासून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यां कोरलेल्या आहेत. या पाय-या वरून विहिरीत उतरले की डाव्या बाजूला “शिवलिंग” असलेले शंकराचे मंदिर आहे. सरासरी सात फूट उंच आणि सहा फूट रुंद एवढ्या आकाराच्या मंदिरात शिवलिंग आहे. मंदिराच्या आतील दोन्ही बाजूंच्या कोपऱ्यात भुयारी मार्ग आहे. सध्या ते मुजलेल्या अवस्थेत आहेत. मंदिराच्या अगदी समोर नंदी आहे. हे शिवमंदिर विहिरीच्या अगदी मधोमध असल्याने मंदिरात नेहमी अंधार असतो. पाय-या वरून विहीरीत उतरल्यावर मंदिरात जाण्यासाठी बैटरीची आवश्यकता असते. इतिहासातील कलेचा अद्भुत नमुना असणारी हि “गजलक्ष्मी तलवार वीहिर” सुंदरगडाचे आकर्षण आहे.
गजलक्ष्मी तलवार विहिर आणि विहिरीतील शिवमंदिर यांची पुरातन एक दंतकथा आहे. या सुंदरगडाच्या घे-याने साठ गावे वसलेली आहेत. म्हणुन या गडाला दुसरे नाव घेरादात्तेगड असे आहे. पूर्वी या साठ गावात कुठेही शुभ कार्य असल्यास शुभ कार्याच्या जेवणावळी साठी लागणारी भांडी विहीरीतील शिवमंदिराजवळ मिळत असत. ज्यांच्या घरी शुभ कार्य आहे. त्या कार्य मालकांनी गडावर येऊन विहीरीच्या शिवमंदिरात अभिषेक, पुजा करून पानांचा विडा ठेवून हात जोडून देवाला भांड्यांची मागणी करावी. शुभ कार्य पार पडल्यास प्रामाणिक पणे सर्व भांडी परत करण्याचे वचन द्यावे. असे केल्याने विहीरीतील शिवमंदिराजवळ भांडी येत असत. असे जुन्या जाणत्या लोकांकडून दंतकथा सांगितली जाते.
गजलक्ष्मी विहिरीत असलेल्या शिवमंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी उत्सव साजरा करतात. महाशिवरात्रीला देखील उत्सव साजरा केला जातो. उत्सव काळात मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत अभिषेक, पुजा- महाआरती, आणि टोळेवाडीसह परिसरातील गावांतील ग्रामस्थांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्त पर्यटक यांची “गजलक्ष्मी तलवार” विहिरीतील शिवमंदिरात गर्दी होत आहे.
सुंदरगडावरुन आजुबाजुच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य सह्याद्रीच्या रांगा, कोयना नदीचा नागमोडी प्रवाह, भैरवगड, वसंतगड, गुणवंतगड या किल्ल्यांचे सहज होणारे दर्शन, किल्ल्यावरून दिसणारा सुर्यास्त आणि पायथ्याला असणाऱ्या पाटण शहराचा परिसर दिवसेंदिवस शिवभक्त पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. याबरोबर किल्ल्याच्या महाव्दारात भव्य असणा-या श्रीगणेश आणि वीर हनुमानाच्या आकर्षक मृर्ती देखील पाहाण्यास व त्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.