Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीखेळण्यातला देव... देवळात... बोंद्रीच्या रस्त्यावर देवाचाच मांडला खेळ

खेळण्यातला देव… देवळात… बोंद्रीच्या रस्त्यावर देवाचाच मांडला खेळ

पाटण:- ( शंकर मोहिते ) – ऋषी-मुनी, साधू- संता पासून आजच्या वैज्ञानिक युगातील ज्ञानी लोक सांगतात की देवांवर श्रध्दा असूद्यावी… अंधश्रध्दा नसावी. या विचारा पलिकडे जाऊन बोंद्री येथे खेळण्यातला देव हळूहळू देवळात आला असून येणा-जाणारा तिथं नत- मस्तक होताना दिसतो. आता या ठिकाणी दररोजची पुजा-आर्ची, गुलाल अगरबत्ती वाहिलेली दिसते. हळूहळू या खेळण्यातल्या देवाचा देवारा आकार घेऊ लागला आहे. लोकांचीहि श्रध्दा कि अंधश्रध्दा पाहून पाहणार्याला या देवा विषयीच नवल वाटू लागले आहे. गावातील अनेकांना या देवा विषयी विचारले असता कोणा जवळहि उत्तर नाही.

मात्र काही वर्षांपूर्वी अलिकडच्याच काळात शाळेतील काही दोन-तीन मुलं शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना त्यांना येथील भुरंबेश्वराच्या मंदिरातील एक कोरीव दगड रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. तो त्यांनी उचलून काही अंतरावर पुढे नेला. आणि रस्त्याच्या कडेला असणार्या आंब्याच्या झाडाखाली देव देवाऱ्यात ठेवतो असा ठेवला. दुसऱ्या दिवशी याच मुलांनी नेहमी प्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना याच देवाला चारी बाजूने काट्या उभ्या करून प्लॅस्टिकच्या कागदाचा मांडव केला. आणि तिथं रानात सहज उपलब्ध होणारी फुले वाहिली. दिवसेंदिवस या मुलांचा घरातुन शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी परतत असताना इथं खेळण्यातल्या देवाच्या ठिकाणी दररोजचा काही तरी उपक्रम ठरलेलाच फुल, अगरबत्ती, गुलाल… नंतर काट्या उभ्या करून तयार केलेला प्लॅस्टिकच्या मांडवाची जागा कच्च्या विटांनी घेतली. हळूहळू या विटांवर छायाछत्र पडले आणि भगवा झेंडा हि लागला.
अगदी रस्त्याच्या काठावर असलेल्या या मंदिरात रोजची पुजा अर्चा होऊ लागली. ज्या पाचवी-सहावीतल्या मुलांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कोरीव दगड देव समजून झाडाखाली ठेवला. ती मुल आज महाविद्यालयात जातात तर सध्या पाचवी-सहावीला असणारी मुलं इथं देवाची पुजा अर्चा करताना दिसतात. दिवसेंदिवस मुलांची श्रध्दा कि अंधश्रध्दा इथं वाढताना दिसते. तसं पाहिलं तर बोंद्री गावाचा मुख्य रस्ता. या रस्त्यावर खेळण्यातला देव रस्त्याच्या काठावरच बसला भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण होण्याचे सुचित झाल्यास रस्त्यासाठी हा देव अडथळा होऊ नये येवढीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बोंद्री गावातील सुज्ञ नागरिकांनी या मुलांशी संपर्क साधून या देवाला येथे जवळच असलेल्या भुरंबेश्वराच्या मंदिरात जागा करून द्यावी व हा देवाचा रस्त्यावर मांडलेला खेळ संपवावा. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular