औंध : पुसेसावळी जिल्हा मध्यवर्ती बँक दरोडा तपास प्रकरणाला तीन दिवस उलटून गेले तरी म्हणावी तशी गती आली नसून सुमारे एक कोटी पासष्ट लाखाच्या दरोडा प्रकरणी अद्यापही पोलीसांच्या हाती काही लागले नसून पोलीस यंत्रणेसमोर या तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
सलग सुट्टया व बँकेचा परिसर हा निर्जन स्थळी असल्याचा डाव साधत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पश्चिमेकडील बाजूकडून बँक फोडून बँकेतील सुमारे एक कोटी अठरा लाखाचे सोने व 47 लाख 50हजाराची रोकड बँकातील दोन्ही लाँकर्स तोडून दरोडेखोरांनी चोरून नेली आहे. दरोडा टाकताना अतिशय नियोजनबद्ध हे काम दरोडा टाकणारांनीकेल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून एवढया मोठ्या रक्कमेचे सोने व रोकड गेल्याने पुसेसावळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मागील दोन दिवसांपासून या घटनेची जोरदार चर्चा खटाव तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे या घटनेचा तपास पोलीस यंत्रणेसमोर आव्हान बनला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी यांनी भेट दिली आहे. त्याचबरोबर एलसीबी पथकाने ही याठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.
याबाबत पोलीस यंत्रणा सर्व शक्यता तपासत असून एवढया मोठ्या रक्कमेचा व दरोडयाचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे.मात्र अजूनही तपासाने म्हणावी तशी गती तीन दिवसांत घेतलेली नाही.जिल्हा बँकाना वारंवार चोरटे लक्ष करत असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या दरोडयाचा तपास केव्हा लागणार याची उत्सुकता व चर्चा पुसेसावळी परिसरात सुरू असून या घटनेचा छडा त्वरित लावून बँक ग्राहक ,नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. पोलीस गस्त अधिक कडक करण्याची मागणी केली जात आहे.
पुसेसावळी दरोडा प्रकरणी तपास जैसे थे
RELATED ARTICLES