Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीकिसनवीरच्या वतीने सोमवारी कृषीदिन व रोपविक्री शुभारंभ

किसनवीरच्या वतीने सोमवारी कृषीदिन व रोपविक्री शुभारंभ

भुईंज: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने हरितक्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषीदिन सोमवारी (1 जुलै) सकाळी 10 वाजता कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध फळझाड रोपविक्रीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सेंद्रिय शेती तज्ञ डॉ. संतोष सहाणे यांची प्रमुख उपस्थिती असून यानिमित्ताने उपस्थित शेतकर्‍यांना ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने कृषीदिनाच्यानिमित्ताने कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात होणार्‍या बदलाची माहिती व्हावी यासाठी प्रतिवर्षी या कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी, जल, पर्यावरण अशा शेतीशी निगडीत विषयांसह विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. यंदा कृषी दिनानिमित्ताने सेंद्रिय शेती तज्ञ डॉ. संतोष सहाणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सेंद्रिय शेती, कृषी किटकशास्त्र व कृषी व्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ञ म्हणून गेली 14  वर्षे त्यांनी काम केलेले आहे. 22 वेगवेगळ्या देशातील शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती व कृषी व्यवस्थानाबद्दल मार्गदर्शन करीत असून अफ्रिकेतील सेंद्रिय शेती व फुलोत्पादन व  फिलीपाईन्समधील   केळी प्रकिया, अरब राष्ट्रांमधील संरक्षित शेती व्यवस्थापन व हॉलंडमध्ये अन्न  सुरक्षितता यांचा समावेश होतो. बदलत्या हवामानानुसार उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढवुन दर्जेदार शेती उत्पादन कशा पद्धतीने घ्यावे व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा विकास करण्याबाबत डॉ. सहाणे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या ज्ञानाचे व अनुभवाचे बोल या कार्यक्रमाच्यानिमित्ताने उपस्थित शेतकर्‍यांना अनुभविण्यास मिळणार आहे. यानिमित्ताने केसर, रत्ना, हापूस या जातींचे आंबा, प्रताप, बाणवली, ऑरेंज डॉर्फ या जातीचे नारळ, बाळानगर सिताफळ, कालीपती चिकू, थायलंड, प्रतिष्ठान चिंच, सरदार पेरू, साई सरबती लिंबू आणि कोकण बहाडोली जांभूळ अशा विविध फळझाड रोपे विक्रीचा शुभारंभही डॉ. सहाणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकरी, हितचिंतक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोक जाधव व संचालक मंडळाने केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular