कराड: भारतीय जनता पार्टीचे नेते आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात झालेल्या विविध विकासकार्याचा आढावा घेणार्या विकासाचे अतुलपर्व या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
वेणूताई चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ना. डॉ. अतुलबाबा भोसले, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेविका विद्या पावसकर, शेतीमित्र अशोकराव थोरात, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, रामकृष्ण वेताळ, अॅड. दिपक थोरात, म्हाडाफचे संचालक पैलवान आनंदराव मोहिते, राजू मुल्ला, महादेव पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अतुलबाबांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या या निधीतून नळ पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, ग्रामीण भागातील देवस्थानांना विशेष दर्जा, कराड शहरासाठी पूरसंरक्षक भिंत अशी अनेक विकासकामे साकारण्यात आली आहेत. तसेच अतुलबाबांच्या माध्यमातून पंढरपूर येथे साकारण्यात आलेली विकासकामे तसेच जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी सुरू असलेले विविध सामाजिक उपक्रम आदी कार्याचा आढावा या पुस्तिकेत घेण्यात आला आहे.
प्रकाशनाप्रसंगी बोलताना ना. चरेगावकर यांनी या कार्यअहवाल पुस्तिकेचे कौतुक करून, अतुलबाबांनी केलेल्या विधायक कार्याचा अहवाल घरोघरी पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. ना.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारच्या कार्याचा आढावा घेतला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, काँग्रेस म्हणजे ठेकेदारांची पार्टी झाली आहे. कार्यकर्त्यांना सांभाळण्यापेक्षा ठेकेदारांना पोसण्यातच त्यांना जास्त रस असल्याने भागाचा विकास रसातळाला गेला आहे. आम्ही मात्र कार्यकर्त्याला कधी उघड्यावर पडू दिलेले नाही. कराड दक्षिणमध्ये भाजपाचे कमळ भक्कमपणे उभा राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात यांचेही भाषण झाले. भरत कदम यांनी प्रास्तविक केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सुत्रसंचालन केले. सूरज शेवाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचे अतुलपर्व पुस्तिकेचे प्रकाशन उत्साहात
RELATED ARTICLES