प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्थांकडून स्पर्धेचे आयोजन
कराड: स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. दिवाळीच्या सुट्टया लागताच घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चिमुकल्या शिलेदारांची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या खरेदीत चित्रे आणि किल्ला बनवण्याचे इतर साहित्य देखील महत्वाचा घटक बनलेला दिसतोय. दिवाळी हा हिंदु धर्म संस्कृतीतला सर्वांत मोठा सण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्याची आणि त्यागाची दिवाळीतही आम्हाला आठवण रहावी, या उद्देशाने घरासमोर किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे.
गावागावातील चाळी, वाडे आणि हवेल्या सिमेटच्या जंगलात बदलुन माणुसकी कुंपणात बंदिस्त झाली. असली तरी बालगोपाळांकडून घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चालु असलेल्या लगबगीने दिवाळीची चाहुल लागते. आधुनिकतेच्या जमान्यातही किल्ला बनविण्याची क्रेझ नव्या पिढित वाढत असल्याने मावळे, प्राणी, पक्षी, सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवरायांच्या मूर्ती खरेदीसाठी कुंभारवाडयापासून बाजारपेठेपर्यंत चिमुकल्या शिलेदारांची लगबग सुरू झाली आहे.
मुलांना दिवाळीची सुट्टी लागली की सणाच्या खरेदीपेक्षाही किल्ला बनवण्यासाठी लागणार्या साहित्याची जवाजमव आणि खरेदी करताना थोरामोठयांतही बालपण जागे होताना दिसते. दिवाळीच्या सुट्टया सुरू झाल्यानंतर कराडसारख्या भागात लहान मुलांना खेळणे आणि खाण्यापिण्या पेक्षा किल्ले तयार करण्याची भारीच हौस दिसून येते आहे. साधरणत: दसर्यानंतर लाल माती गोळा करून विटा दगडांचे डोंगर साकारले जातात.
हिरवळीसाठी डोंगरावर हाळीव उगवून दिवाळी जवळ येताच डोंगरावर चिखलांचे पायर्या, बुरूज आणि प्रवेशद्वारे बांधून किल्ला साकारण्यात चिमुकले शिलेदार सध्या दंग झालेले दिसत आहेत. किल्ला बांधून झाल्यावर चुना आणि रंगरंगोटीद्वारे त्याला मूर्त स्वरूप दिले जाते. शेवटी भगवा ध्वज आणि सिंहासनावर महाराजधिराज बालेकिल्ल्यावर विराजमान करून प्रवेशद्वारापासून भालदार, चोकटदार सनई चौघडेवाले, घोडेस्वार, सेनापती, मावळे दिमतीला हजर होतात. आणि बच्चेमंडळींना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विविध संस्थाकडुन स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
किल्ला साकारण्यात चिमुकले शिलेदार दंग
RELATED ARTICLES