Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकापील ग्रामपंचायत निवडणूकीत बाबा-काका गटाकडून सत्तांतर

कापील ग्रामपंचायत निवडणूकीत बाबा-काका गटाकडून सत्तांतर

कराडः कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागलेल्या कापील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कापील ग्रामविकास पॅनेलने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत पॅनेलचा पराभव केला. काँग्रेसने सरपंचपदासह 7 तर भाजपने 5 जागा जिंकल्या.
गेली 15 ते 20 वर्षे ग्रामपंचायतीवर कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार (कै.) जयवंतराव भोसले गटाने माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटाला सोबत घेवून सत्ता राखली होती. त्या सत्तेला काँग्रेसच्या पॅनेलने पायउतार केले आहे.
या निवडणूकीत विलासराव पाटील-उंडाळकर गटाची भूमिका निर्णायक ठरली. नुकत्याच झालेल्या मलकापूर नगरपालिका निवडणूकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाने एकत्र येवून नगरपालिकेची सत्ता कायम राखली. त्याच धर्तीवर कापील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतही यश मिळाले आहे.
कापील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सत्ताधारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत जनसेवा ग्रामविकास पॅनेल उभे होते. त्याविरोधात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांना मानणाऱया काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कापील ग्रामविकास पॅनेल उभे होते. पहिल्यांदाच थेट लोकनियुक्त सरपंच निवड असल्याने निवडणूकीकडे तालूक्याचे लक्ष लागले होते. या जागेसाठी काँग्रेसने पंचायत समितीच्या माजी सदस्या कल्पना गायकवाड यांना संधी दिली होती. कल्पना गायकवाड यांनी विरोधी प्रमिला ढापरे यांचा तब्बल साडेचारशे इतक्या मोठ्या मत्ताधिक्याने दारुण पराभव केला.
काँग्रेसचे धोंडिराम मोरे, संभाजी मदने, सुषमा देशमुख, नितीन ढापरे, सुनंदा कुंभार व पराग जाधव हे सदस्य निवडून आले. निकालानंतर कापील ग्रामविकासच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व अविनाश मोहिते यांनी अभिनंदन केले आहे. विजयी पॅनेलचे पांडूरंग देशमुख, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक जगन्नाथ मोरे, गोकाकचे चेअरमन भरत पाटील, मोहन जाधव (भाऊ), सुरेश जाधव, प्रल्हाद जाधव, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रल्हाद देशमुख, श्रीरंग मोरे, दत्तात्रय जाधव, भाऊसाहेब ढेबे यांनी नेतृत्व केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular