Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शहीद जवानांच्या कुटुंबियांना 34 लाखांची मदत

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शहीद जवानांच्या कुटुंबियांना 34 लाखांची मदत

कराड: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सी.आर.पी.एफ.च्या ताफ्यावर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजयसिंह राजपूत या दोन वीरपुत्रांचा समावेश आहे. या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रत्येकी 17 लाख असे एकूण 34 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश आज बुलढाणा येथे प्रदान करण्यात आला. या मदतनिधीसाठी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संलग्नित विविध संस्थांमधील कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त आर्थिक सहभाग देत आदर्श निर्माण केला आहे.
पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांवर मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवानांच्या वीरमाता-पिता, वीरपत्नींचा त्याग मोठा असून, त्यांच्या धैर्याला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचा सलाम आहे. त्यांच्या कुटुंबात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी असून, त्यांच्या या दुःखात कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संलग्नित कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ, केसीटी कृष्णा स्कूल, कृष्णा फार्मसी महाविद्यालय आदी सर्व संस्थांमधील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी व विद्यार्थी सहभागी आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ट्रस्ट संलग्नित संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या आर्थिक सहकार्यातून जमा झालेला एकूण 34 लाख रूपयांचा निधी आज बुलढाणा येथे प्रदान करण्यात आला.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे व सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते आणि बुलढाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी बी. एस. घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद जवानांच्या कुटुंबियांना 34 लाखाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने नेहमीच सामाजिक बांधलिकी जपत राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रत्येकवेळी योगदान दिलेले आहे. ट्रस्टचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांनी घालून दिलेल्या सामाजिक बांधिलकीच्या पायवाटेवरून चालण्याचा आमचा प्रयत्न असून, शहीद जवानांच्या कुटुंबियांना भविष्यातही सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही संस्थेच्यावतीने डॉ. एम. व्ही. घोरपडे व एस. ए. माशाळकर यांनी यावेळी दिली. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारीही उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular