मल्हारपेठ : कदमवाडीच्या कुस्ती आखाड्यात कोल्हापूर शाहू कुस्ती केंद्रचा पैलवान संग्राम पाटील यांनी दिल्लीच्या पैलवान सोनुकुमारला ढाक मारणे डावावर चितपट करून अस्मान दाखविले व दिड लाखाचे इनाम जिंकले. श्री हनुमान सेवा समिती व श्री जाणाई देवी यात्रा समितीतर्फे या कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते.
एक लाखाची कुस्ती कोल्हापूर चा पैलवान पृथ्वीराज पाटील व दिल्लीचा पैलवान मोहणती कुमार यांच्यात अटीतटीच्या झालेल्या या कुस्तीत हात काढून घिससा मारणे या डावा चे दर्शन घडवून पैलवान पृथ्वीराज पाटील विजयी झाला.
तृतीय क्रमांकाची एक्कावन हजराची कुस्ती कोल्हापूरचा पैलवान अमित कारंडे व दिल्लीचा पैलवान आशिष कुमार यांच्यात झाली डूबुन ढाक मारणे डावावर पैलवान अमित कारंडेने आशिष कुमारला अस्मान दाखविले व विजयी झाला. या कुस्ती मैदानात झालेल्या इतर महत्वाच्या कुस्तीत हरियाणाचा पैलवान प्रिंटेश कुमार तसेच मल्हारपेठ येरांड वाडीचा पैलवान अनिकेत देसाई यांनीही विजय मिळविला.
या कुस्ती आखाड्यात लहान मोठया पंचवीस कुस्त्या झाल्या सर्वच पैलवानानी एकेरी पटाची पक्कड एकलांगी डाव घुटना तसेच नुरा व मोळी बांधणे या विविध प्रकारचे दर्शन कुस्ती शौकिनानी घडविले. या कुस्ती आखाड्याचे उत्तम निवेदन व समालोचन कुस्ती मार्गदर्शक व निवेदक ईश्वरा पाटील वारणा नगर यांनी केले. हलगीची साथ लोंढे बंधूनी दिली. यावेळी कुस्ती पंच म्हणून जगन्नाथ गायकवाड, निवृत्ती कुंभार, विजय धामणकर, यादवराव देवकांत, दिनकर धामणकर, सुरेश सत्रे, मानसिंग कदम, अशोक डीगे यांनी केले.
कुस्ती विजेत्यांना मदनकाका कदम, रंगराव कदम, अजित कदम, सुजित कदम, गणेश कदम, निवास कदम, संजय कदम, मारुती कदम, अधिक कदम, आबासो वाघ, समीर कदम, शहाजी कदम, मारुती डीगे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करणेत आले, कदमवाडीच्या कुस्ती आखाड्यास कुस्ती शौकिनानी उत्स्फूर्त दाद दिली.
सुत्रसंचलन गणेश कदम यांनी केले. प्रास्ताविक अजित कदम यांनी केले. सर्वांचे स्वागत मदन काका कदम यांनी केले.