Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीजुना कृष्णा पूल पाडू देणार नाही ; कराडकरांचा महामार्ग प्राधिकरणाला इशारा

जुना कृष्णा पूल पाडू देणार नाही ; कराडकरांचा महामार्ग प्राधिकरणाला इशारा

कराड: जुना कृष्णा पूल पाडण्यामागचा उद्देश काय ? जुन्या कृष्णा पुलावरील वाहतूक बंद करू देणार नाही, कराडहून विद्यानगरकडे जाणारी वाहतूक सध्याच्या नवीन पुलावरून वळवून देणार नाही, याबाबत प्रशासनाचे नियोजन काय ? सध्यस्थितीत पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणांबाबत कोणती कार्यवाही सुरू आहे ? यासह अन्य प्रश्‍नांची सरबत्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रमेश पन्हाळकर यांच्यावर कराडकर नागरिकांनी केली. तसेच हा पूल पाडण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभारू, असा सज्जड इशारा कराडकर नागरिकांनी दिला आहे. दि.6 मे रोजी प्रा. अशोक चव्हाण यांनी याच विषयावर बोलविलेल्या पत्रकारांच्या बैठकीत शहरातील बहुतांश पत्रकार उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे दि.8 च्या जुना कृष्णा पुल पाहणीसाठी पत्रकार व नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर जुना कृष्णा पुल बचाव कृती समिती स्थापन करण्यासाठी कराडसह परिसरातील नागरिकांची शुक्रवारी दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक होणार असून परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
गुहागर-विजापूर राज्यमार्गाचे आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. त्यामुळे कृष्णा नदीवर नवीन कृष्णा पूल व जुना कृष्णा पूल यामधील जागेत नवीन पूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळेच जुना कृष्णा पूल पाडला जाऊ नये, यासाठी कराडमधील पत्रकारांसह लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, अरूणकाका पाटील, पोपटराव साळुंखे, ओगलेवाडीचे प्रशांत यादव, जिमखान्याचे सुधीर एकांडे, शेतकरी संघटनेचे सचिन नलावडे, साजिद मुल्ला, अनिल घराळ, मनसेचे सागर बर्गे, शिवसेनेचे स्वप्निल कुलकर्णी, रमेश जाधव-पाटील, राघवेंद्र कोल्हापुरे, डॉ. सुधीर कुंभार, मराठा महासंघाचे गणेश पवार, हेमंत केंजळे, शामराव सोनावणे, तानाजी भंडारे, मकसुद शेख, राजाराम सोनावणे, मनिष यादव, अक्षय निकम, नदीम पालकर, श्रीकांत कांबळे, मुजीन ङ्गकिर, इकबाल राजपूरकर, अर्जुन काटवटे, पत्रकार प्रा. अशोक चव्हाण, दिलीप भोपते, सतीश मोरे, देवदास मुळे, गोरख तावरे, सचिन देशमुख, श्रीकांत कुंभारदरे, अक्षय मस्के, रुपाली जाधव, प्रगती पिसाळ, चंद्रजीत पाटील, अशोक मोहने, प्रकाश पिसाळ, समीर आराणके, संतोष शिंदे, शंकर शिंदे, अजिंक्य गोवेकर यांच्यासह पत्रकार, नागरिक यांनी बुधवारी दुपारी कृष्णा पुलाच्या कृष्णा नाका आणि कृष्णा कॅनॉल या दोन्ही बाजूंची पाहणी केली.
त्यानंतर कार्यकारी अभियंता पन्हाळकर हेही कृष्णा नाका परिसरात नागरिकांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी नागरिकांनी पुलाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे कायम आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघातांचा धोका आहे. जुन्या पुलावरील वाहतूक बंद केल्यास हा धोका वाढणार असून वाहतूक कोंडीही होणार आहे, हे पन्हाळकर यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी प्रा. अशोक चव्हाण, सौरभ पाटील, प्रशांत यादव, सुधीर एकांडे, अशोक मोहने, चंद्रजीत पाटील यांच्यासह नागरिकांनीही पूल पाडण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्‍न उपस्थित करत कराड, सैदापूर, ओगलेवाडीसह परिसरातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगत आपल्या भावनाही व्यक्त केल्या. यावेळी रमेश पन्हाळकर यांनी याप्रश्‍नी प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह नागरिकांसमवेत संयुक्त बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular