ना.डॉ.अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते व इंद्रजीत मोहिते यांच्यावर डागली तोफ
कराड : कृष्णा कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याची घाई झालेल्या माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांचा सहकाराचा अभ्यास कच्चा आहे. सहकार कायद्यातील 97 व्या घटनादुरुस्तीनुसार कृष्णा कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ कार्य करीत असताना, विरोधक मात्र राजकीय हेतूने मुद्दे उपस्थित करून सभासदांची दिशाभूल करण्याची धडपड करत आहेत. या दोन्ही माजी चेअरमनचा हा आटापिटा निव्वळ कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठी सुरू असल्याची टीका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 गळीत हंगामाकरिता तोडणी वाहतूक करार शुभारंभ व सभासद मोफत साखर वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक गुणवंतराव पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, कार्यकारी सूर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, संजय गांधी निराधार योजनचे तालुकाध्यक्ष संजय पवार, कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सहकार कायद्यातील 97 व्या घटनादुरूस्तीनुसार कारखान्याकडून अक्रियाशील सभासदांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. यावरून विरोधकांनी आरोपांची राळ उडविली असताना त्यांना रोखठोक उत्तर देण्याचे काम डॉ. अतुल भोसले यांनी केले. सहकार कायद्यानुसार सभासदांनी संस्थेशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे. मात्र अनेक सभासद कारखान्यास अनेक वर्षांपासून ऊसपुरवठा करत नाहीत. अशा सभासदांना कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीसा पाठविल्या असता, विरोधकांनी मात्र पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे सभासदांचा मताधिकार डावलला जात असल्याचा कांगावा सुरू केला आहे. कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याच्या उद्देशानेच हे दोन्ही माजी चेअरमन आटापिटा करत असल्याचा टोला लगावत, डॉ. भोसले यांनी सूज्ञ सभासद मात्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.
कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की स्थिरता लाभली की अनेक प्रश्न मार्गी लागतात. कामगारांचे प्रलंबित प्रश्न येत्या काळात निश्चित सोडविले जातील. कारखान्याने तोडणी यंत्रणेत पारदर्शकता आणली असून, शेतकी खात्याने आधुनिक नोंदणी यंत्रणेचा वापर करत तोडणी यंत्रणेत सुसुत्रता आणली आहे. त्यामुळे कृणा कारखान्याकडे ऊस घालण्यासाठी शेतकरी सभासदांचा ओढा दिसून येत आहे.
यावेळी संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. तसेच तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सेक्रेटरी मुकेश पवार, सरव्यवस्थापक पी. डी. राक्षे, मुख्य अभियंता सुहास घोरपडे, असि. डिस्टलरी मॅनेजर प्रतापसिंह नलवडे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ईडीपी मॅनेजर अवधूत रेणावीकर, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, कामगार कल्याण अधिकारी अरूण पाटील, वरिष्ठ अभियंता डी. व्ही. कुंभार, पर्चेस ऑफिसर रवींद्र देशमुख, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, वाहतूक अधिकारी गजानन प्रभुणे, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख यांच्यासह तोडणी वाहतूकदार, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठीच दोन माजी चेअरमनचा आटापिटा
RELATED ARTICLES