कराड : इतिहासाचे, विचाराचे, परंपरांचे जतन ग्रंथालये करतात. मात्र त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात नाही. ग्रंथालय संदर्भातील प्रलंबित मागण्या, शैक्षिणक अडचणी, रोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी सुशिक्षितांमधून जाणारा योग्य पदवीधर आमदार निवडूण द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेलचे प्रदेश प्रमुख सारंग पाटील यांनी केले.
कराड येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी ग्रंथालय विभागातर्फे पुणे पदवीधर मतदार जागृती अभियान पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानंद दूधचे व्हा. चेअरमन डि.के. पवार, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हणमंतराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान श्रीनिवास पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सनबीम शिक्षण समूह यांच्या वतीने जिल्ह्यातील ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली.
सारंग पाटील म्हणाले, देशात आणि राज्यात ग्रंथालय चळवळ अतिशय जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही कायम आहेत. या ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढीला देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही. त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे.जो समाज इतिहास विसरतो, त्याला भविष्य राहत नाही. त्यामुळे ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे कार्य यापुढेही चालू ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्रंथालयांसमोर अनेक अडचणी आहेत. त्याबद्दल अपेक्षीत निर्णय होत नाहीत.
समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. मात्र त्यातुलनेने आपल्या अधिकाराबद्दल जागरुकता झाली नाही हे दुर्दैवी आहे. काळानुसार आपल्याला बदलावे लागेल. सुशिक्षितांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुशिक्षितांमधून जाणारा योग्य प्रतिनिधी निवडून द्यावा. ती संधी पुणे पदवीधर निवडणूकीच्या माध्यमातून आली आहे.
स्वागत सरचिटणीस संजय पिसाळ यांनी केले. आभार उमेश साळुंखे यांनी मानले. यावेळी प्रशांत निकम, शरद चव्हाण, विजय सुर्वे, विश्वास निकम, लक्ष्मण घाडगे, दिपकराव शिर्के, अन्य पदाधिकारी व ग्रंथपाल उपस्थित होते.
सुशिक्षितांमधून जाणारा योग्य पदवीधर आमदार निवडूण द्यावा:सारंग पाटील
RELATED ARTICLES

