कराड: भारतीय जनता पार्टीच्या कराड दक्षिण मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ कार्यकर्त्यांचे भव्य संमेलन शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता वाठार (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सुमारे 7000 बुथ कार्यकर्ते संमेलनात सहभागी होणार आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ना. चंद्रकांतदादा पाटील प्रथमच कराडला येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा कराड दक्षिणच्यावतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार कंबर कसली असून, संघटनात्मक पातळीवर पक्षाला बळकटी मिळवून देणार्या बुथ कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन पक्षाच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी केले जात आहे. कराड दक्षिण मतदारसंघात 305 बुथ असून, या प्रत्येक बुथमध्ये 25 कार्यकर्त्यांचा संच तयार करण्यात आला आहे. या बुथ कार्यकर्त्यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात केलेल्या कार्याचा आढावा या संमेलनात घेण्यात येणार आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या संघटनात्मक कार्याबाबत विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना.डॉ.अतुलबाबा भोसले, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वाठार येथे आज भाजपाचे भव्य विजय संकल्प बूथ संमेलन
RELATED ARTICLES