कोरेगाव: कोरेगाव तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या तहसीलदार कार्यालय परिसरात सोमवारी माकडाने हैदोस घातला असून, तीन जणांना ते चावले, यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. या माकडामुळे भीतीचे वातावरण असून, त्याच्या दहशतीपुढे प्रशासकीय यंत्रणा हतबल बनली आहे. दरम्यान, वन विभागाने तातडीने उपाययोजना करुन, माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की कोरेगाव तहसीलदार कार्यालयात सोमवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि प्रशासकीय कामकाजाचा असतो. अर्धन्यायिक कामकाजाबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालय, उप कोषागार कार्यालय, पोलीस ठाणे, नागरी सुविधा केंद्र, तलाठी संघटना कार्यालय परिसरात तालुक्याच्या कानाकोपर्यातून लोक शासकीय कामकाजासाठी येत असतात. शनिवार आणि रविवार हे सलग दोन सुट्ट्यांचे दिवस गेल्याने सोमवारी सकाळपासून परिसरात गर्दी होती.
साधारणत: 11.30 च्या सुमारास माकड परिसरात दाखल झाले. त्याने पोलीस वसाहत परिसरातून पोलीस ठाण्याच्या इमारतीवर उडी घेतली आणि सावलीत ठाण मांडले. त्यानंतर जाता-येता ते चावत होते, यामध्ये त्याने तीन जणांचा चावा घेतला. एखाद्या व्यक्तीला चावायचे आणि इमारतीवर जाऊन बसायचे, असा प्रकार त्याच्याकडून सुरु होता. प्रशासकीय कर्मचार्यांबरोबरच नागरिक त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते कोणालाही घाबरत नव्हते. काही काळ तेथेच थांबले आणि त्यानंतर तेथून निघून गेले.
जखमींमध्ये एक लहान मुलगा असून, त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.वन विभागाने तातडीने उपाययोजना करुन, माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
वन विभाग पकडणार माकडाला
कोरेगाव तहसीलदार कार्यालय परिसरात माकडाने चावा घेतला असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत, याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात या माकडाचा शोध घेणार असून, त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले जाईल, अशी माहिती वन विभागाचे तालुका क्षेत्रपाल राजू आटोळे यांनी पत्रकारांना दिली.
कोरेगावच्या तहसील कार्यालय परिसरात माकडाची दहशत, दिवसभरात तिघांना चावले; भीतीचे वातावरण
RELATED ARTICLES