Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडी‘मुलगी दत्तक घेवून डॉ. काळुखे दांपत्याने समाजाला दिला नवविचार’

‘मुलगी दत्तक घेवून डॉ. काळुखे दांपत्याने समाजाला दिला नवविचार’

कोरेगाव: वंश वाढीसाठी आपल्या देशात मुलगा दत्तक घेण्याची परंपरा आहे, मात्र मुलींमध्येही देशाचे भविष्य दडलंय हा संदेश देत चक्क एका अनाथ मुलीला दत्तक घेवून कोरेगांवच्या डॉ. शारदा व डॉ. राजन काळुखे या दांपत्याने समाजाला एक नवा आदर्श विचार दिला असल्याचे प्रतिपादन कोरेगांव विकास मंचचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांनी व्यक्त केले.
कोरेगांवच्या शांतीनगर विभागात गेली अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉ. शारदा व डॉ. राजन काळुखे या दांपत्याच्या आदर्श सेवाभावी वृत्तीचा गौरव कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने नुकताच करण्यात आला, त्यावेळी किशोर बर्गे बोलत होते. निवृत्त वाहतुक निरीक्षक रामचंद्र बोतालजी, विकास मंचचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
किशोर बर्गे यावेळी म्हणाले, डॉ. काळुखे दांपत्याने एका सामाजिक जाणीवेतून दुर्वा या मुलीचा अगदी लहानपणा पासून सांभाळ केला आहे. दुर्वा आज इयत्ता पहिली मध्ये शिकत असून अनाथाला छत्र देण्याचे व त्याचे चांगले संगोपन करण्याचे काम या दांपत्याने केले आहे.
कोरेगांव शहरात सेवाभावी वृत्तीने काम करताना डॉ. शारदा व डॉ. राजन काळुखे या दोघांनीही समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
दुर्वा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमही कोरेगांवात राबविले आहेत. त्यांच्या या उत्तुंग कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचेही किशोर बर्गे यावेळी म्हणाले.
या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. शारदा काळुखे म्हणाल्या, कोरेगांव विकास मंचने केलेला हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. दुर्वाला चांगले शिक्षण देवून यशस्वी महिला करण्याचा आमचा प्रयत्न राहिल असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमास कोरेगांव विकास मंचच्या सदस्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular