कोरेगाव: ज्या मातेने त्यागातून आपल्या कुटुंबाला घडविले त्या आदर्श मातांचा मातृ गौरव हीच खरी संस्कार शिदोरी असल्याचे प्रतिपादन कोरेगांव विकास मंचचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांनी व्यक्त केले. येथील सरस्वती महिला मंडळाच्या वतीने श्रीमती चंद्रभागा एकनाथ बर्गे यांचा आदर्श माता पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला, त्याबद्दल श्रीमती बर्गे यांचा कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने सत्कार करताना किशोर बर्गे बोलत होते.
निवृत्त प्राचार्य अरुण बर्गे, निवृत्त वाहतुक निरीक्षक रामचंद्र बोतालजी, चंद्रकांत बर्गे, विकास मंचचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. किशोर बर्गे यावेळी म्हणाले, कोरेगांव शहरात एक आदर्श डॉक्टर, प्राचार्य, वकील घडविणारी एक संस्कारक्षम माता म्हणून चंद्रभागा बर्गे यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल.
समाजासाठी काम करणारी मुले घडवून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या आदर्शांचा गौरव म्हणजे खर्या अर्थाने आदर्श संस्कार माऊलीच्या विचारांचाच गौरव असल्याचे ते म्हणाले.
या सत्काराबद्दल प्राचार्य अरुण बर्गे यांनी कृतज्ञता व्यक्त करुन आईचा आज झालेला सन्मान नवी उर्जा देणारा असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास कोरेगांव विकास मंचच्या सदस्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आदर्श मातांचा मातृ गौरव हीच खरी संस्कार शिदोरी: किशोर बर्गे
RELATED ARTICLES