Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीफरारी आरोपी संतोष आखाडेला तीन दिवसांची पोलिस कोठडी

फरारी आरोपी संतोष आखाडेला तीन दिवसांची पोलिस कोठडी

महाबळेश्‍वर: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वर परिसरातील बेरोजगार युवकांना शासकीय नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेवून फरार झालेला आरोपी संतोष आखाडे याला पाचगणी पोलिसांनी अटक केली. आरोपी आखाडे याला महाबळेश्‍वर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
महाबळेश्‍वर तालुक्यातील अनेक बेरोजगारांनी शासकीय व न्यायालयात नोकर भरतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. याची महिती घेवून आरोपी संतोष आखाडे याने वशीलेबाजी लावण्यासाठी व नोकरी मिळवून देण्यासाठी बेरोजगार 36 युवक व त्यांच्या पालकांकडून 2 ते 5 लाखांपर्यंत रोख रक्कम स्विकारली होती. त्यानंतर नोकरभरती होवूनसुद्धा महाबळेश्‍वर तालुक्यातील आरोपीने संपर्क साधलेल्या बेरोजगारांना नोकरी लागली नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे काहींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात रितसर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती आरोपीला समजताच आरोपी महाबळेश्‍वर येथून फरार झाला होता. तक्रारदारांनी वारंवार तपास अधिकारी व पाचगणी पोलीस ठाण्यात तगादा लावल्यानंतर अखेर 1 महिन्यानंतर आरोपीला पोलीसांनी अटक केली. महाबळेश्‍वर न्यायालयाचे न्यायाधीश एस.यु.कानथे यांच्या समोर तपास अधिकार्‍यांनी आरोपीला उभे केल्यानंतर अधिक तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी मान्य करुन न्यायालाने आरोपीला कोठडी सुनावली.
यावेळी फसवणूक झालेल्या बेरोजगार युवक व त्यांच्या पालकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. तसेच याठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular