केळघर : मेढा दक्षिण विभागातील मेढा कुसुंबी सातारा या मार्गावर धावनार्या लालपरीचा कारभार मनमानी पद्धतीने चालू असून कुसुंबी विभागातील एस टी बसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून पडले असून एस.टी. विभागाच्या या दिशाहीन कारभाराबाबत या विभागातील नागरिकांनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
याबाबत वेण्णा दक्षिण शेतकरी मंडळामार्फत मेढा आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मेढा कुसुंबी सातारा या मार्गाने जाणारी एस.टी. बस आगारातून वेळेवर सुटत नसून त्यामुळे प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. मेढा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने महाविद्यालयीन तसेच विविध क्लास, आयटीआय आदी शिक्षणासाठी मुले व मुली मोठ्या संख्येने या भागातून येत असतात. दक्षिण विभागातील मालचौंडी, दुंद, करंडी, निझरे, सांगवी त.मेढा, घरातघर आदी गावे ही मुख्य रस्त्यापासून दोन तीन किलोमीटर आतमध्ये असून संध्याकाळी साडेपाचला सुटनारी गाडी उशिरा सुटल्यावर विशेषतः महिला व मुली यांना रात्रीचा चालत प्रवास करावा लागतो. तसेच सकाळ च्या गाड्या ही वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी उशिर होतो. तसेच रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने एस टी महामंडळ अनेक गाड्या अचानक कमी करते पण रविवारी ही विद्यार्थ्यांचे जादा तास तसेच ईतर क्लास असतात त्यामुळे रविवारी ही नेहमीच्या वेळेप्रमाणे गाड्या सोडाव्यात. तरी एस टी प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन आपला कारभार सुधारावा अन्यथा विभागातील नागरिक आंदोलन करून होणार्या नुकसानीस आपण जबाबदार असाल असा ईशारा ही शेवटी निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान केळघर विभागातील केडंबे, बोडांरवाडी या मार्गावरील अनेक फेर्या सुट्टी दिवशी रद्द होत असल्यामुळे याचा त्रास विद्यार्थी, वयोवृध्द नागरिकांना बसत आहे. त्यामुळे यापरिसरातील नागरिकही मेढा आगाराच्या या अनियमित कारभाराला वैतागले असून ते ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कुसुंबी विभागातील एस.टी. बसचे वेळापत्रक कोलमडले ; नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा
RELATED ARTICLES