म्हसवड: माण तालुका हा जरी दुष्काळी असला तरी या दुष्काळी तालुक्यात बुध्दीवंताची खाण असल्याचे यापूर्वी अनेकांनी दाखवुन दिले आहे, याच बुध्दीवंताच्या खाणीतील हिर्यांना पैलु पाडण्याचे काम म्हसवड येथील मासाळवाडीत सुरु असुन ते काम करणारे डॉक्टर दांपत्याच्या माणगंगा पँरामेडीकल कॉलेज मध्ये गत 5 वर्षापासुन सुरु आहे असे मत सौभाग्यवती आ. सोनिया गोरे यांनी व्यक्त केले.
मासाळवाडी येथील माणगंगा पँरामेडीकल कॉलेज मध्ये आयोजीत स्नेह मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या यावेळी माण फाऊंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा, अधिक्षक किरण पाटोळे, डॉ. मनोज ओंबासे, डॉ. सुरेश मासाळ, संस्था अध्यक्ष व नगरसेवक डॉ. वसंत मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ, सचिव नारायण मासाळ, खजिनदार मधुकर मासाळ, संचालिका सविता मासाळ आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सौ. गोरे म्हणाल्या की मासाळवाडीच्या माळरानावर डॉ. मासाळ यांनी 5 वर्षापुर्वी माणगंगा पँरामेडीकल कॉलेज या नावाने लावलेले छोटेसे रोपटे आज विशाल असा आकार घेत आहे हे पाहुन आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो आहे त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचेही त्यांना मोठे सहकार्य लाभले आहे हे पती पत्नी या विद्यालयासाठी घेत असलेली मेहनत ही खरोखरच वाखण्याजोगी अशीच आहे.
माण सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवुन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांची सुरु असलेली ही धडपड आज चांगलीच कामी येत असुन आजवर सदर विद्यालयात प्रशिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी व विद्यार्थीनी ह्या शासकीय व निमशासकीय सेवेसह स्वत:च्या व्यावसायात आहेत सदर विद्यालयात रक्त, लघवी, तपासणी रेडिओलॉजी टेक्निशिअन व नर्सींगचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असुन ते शिक्षण देण्यासाठी येथे असणारे शिक्षक हे त्या – त्या विषयात तज्ञ आहेत त्यामुळेच आज मासाळवाडी हा परिसर व्यावसायिक शिक्षण देणारी फँक्टरी म्हणून जिल्ह्यात ओळखला जावु लागला आहे.
यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या प्रमुख श्रीमती चेतना सिन्हा बोलताना म्हणाल्या की गत 5 वर्षापासुन मी येथील कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आलेली आहे हे विद्यालय उभारण्यासाठी नगरसेवक असलेल्या डॉ. वसंत मासाळ यांनी घेतलेले कष्ट मी पाहिले आहे त्यांची चिकाटी व दुरदृष्टी यामुळेच आज याठिकाणी दुरदुरचे विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहे, अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असताना देखील डॉक्टरांनी आपल्या विश्वासु सहकार्यांच्या जोरावर मारलेली शैक्षणिक मुसंडी ही अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली आहे.
इयत्ता 1 ली ते 10 पर्यंत चे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरु करुन गत 5 वर्षापासुन 10 वी चा 100 टक्के निकाल लावण्याचा रेकॉर्ड या विद्यालयाने निर्माण केला आहे. तर गत 5 वर्षापासुन सदर विद्यालयाने वेगवेगळे उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेला चालना देण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.
यावेळी विद्यालयाचे प्रमुख असलेले डॉ.वसंत मासाळ यांनी विद्यालयाची प्रगती सांगताना यशाचा चढता आलेख हा उपस्थित पाहुण्यांच्या समोर मांडताना सांगितले की माळरानावर जेव्हा आम्ही सदर विद्यालय सुरु करण्याची संकल्पना मांडली त्यावेळी अनेकांनी आमचा हा निर्णय चुकीचा ठरणार असल्याचे सांगुन आमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र वाळुचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे आम्ही आमचे काम सुरु ठेवले अन आज हे दिवस दिसत आहेत याचा सर्वात मोठा वाटा आहे तो या भागातील पालकांचा त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यामुळेच आज या माळ रानावर शैक्षणिक क्रांती घडु लागली आहे.
यावेळी संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची मासाळवाडी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुक काढण्यात येवुन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मुख्याध्यापक रावसाहेब मासाळ, श्रध्दा करमाळकर, अर्चना वाघुंबरे, रेश्मा ढेंबरे, भगवान सजगाने, प्रा. संतोष बगाडे, माधुरी लिंगे यासह शिक्षक व मासाळवाडी ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
‘माणगंगा पॅरामेडीकल’मध्ये हिर्यांना पैलू पाडण्याचे काम: सोनिया गोरे
RELATED ARTICLES