Thursday, October 23, 2025
Homeठळक घडामोडीनैसर्गिक झर्‍यावर बनवला पाणवठा; मुक्या पशुपक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न

नैसर्गिक झर्‍यावर बनवला पाणवठा; मुक्या पशुपक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न

परळी : (अल्पेश लोटेकर) दुर्गम भागातील कुसुंबी मुरा गावातील निसर्गप्रेमी रमेश तात्याबा चिकणे यांनी वन्य पशू पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी निद्रिस्त अवस्थेतील नैसर्गिक झऱयाची साफसफाई करून नवसंजीवनी दिली. दगड माती आणि पालापाचोळ्याने मुजत चाललेल्या नैसर्गिक झऱयाची साफसफाई करून पाणी साठून राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या परिसरातील वन्य पशू पक्षी आणि पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हक्काचा पाणवठा उपलब्ध झाला आहे. सातारा शहराचा पश्चिमेकडील भाग हा वनसंपदा आणि जैवविविधतेने नटलेला आहे.
या परिसरात अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्य पशू पक्ष्यांचे वास्तव्य आहे. हा परिसर अतिपर्जन्यवृष्टीचा म्हणून ओळखला जातो. परंतु, डोंगर उतार असल्याने पावसाचे पाणी जमिनीत कमी प्रमाणात मुरते आणि मोठया प्रमाणावर पाणी उताराने वाहुन जाते. त्यामुळे या परिसरातील भुगर्भातील भुजल पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. मे महिन्याच्या दरम्यान या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या जलस्त्राीतांत मुबलक पाणी उपलब्ध नसते. नैसर्गिक झ्रयांतील पाणीही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
दरम्यान, वन्य पशू पक्ष्यांचा पाणी न मिळाल्यामुळे मुत्यु होत आहे ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर या गोष्टीची सल मनाला बोचत असल्याने कास पठारालगत कुसुंबी मुरा गावाच्या हद्दीत असलेल्या आबईचा मैल या घनदाट जंगलाने व्यापलेल्या परिसरातील निद्रिस्त अवस्थेतील नैसर्गिक झ्रयाला रमेश तात्याबा चिकणे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने श्रमदानातून नवसंजीवनी देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लावण्यात यश आले आहे. त्यामुळे मुक्या पशू पक्षांना हक्काचा पाणवठा उपलब्ध झाला आहे. या झऱयाची वेळच्या वेळी साफसफाई केली जाईल याची खबरदारीही रमेश यांच्याकडून घेतली जात आहे. त्यांच्या या अभिनंदनीय कार्याचे वन्यजीव आणि निसर्गप्रेमींकडुन कौतुक होत आहे.
सातारा, जावळी आणि पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील घनदाट जंगलाने व्यापलेल्या भागात आजही अनेक बारमाही पाणी उपलब्ध असणारे अनेक नैसर्गिक झरे, पाणवठे आहेत. परंतु, वेळच्या वेळी त्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे ते नष्ट होत चालले आहेत. त्यामुळे या वन्य संपदा आणि जैवविविधतेने नटलेल्या परिसरातील पशु पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत हे नैसर्गिक जलस्त्रोत जिवंत ठेवणे गरजेचे आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular