Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपाटण विधानसभा मतदार संघात घसरलेला टक्का कोणाच्या पत्त्यावर.? ; मतदारांची संख्या वाढली...

पाटण विधानसभा मतदार संघात घसरलेला टक्का कोणाच्या पत्त्यावर.? ; मतदारांची संख्या वाढली मात्र ४% ने टक्का घसरला ; उमेदवारांच्यात “धाकधूक”..

 

पाटण :- (शंकर मोहिते) – अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणूकीपेक्षा मतदारांची संख्या वाढली असताना मात्र २०१९ चालू विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदारांचा टक्का ४ % ने घसरला आहे. २०१४ च्या निवडणुकीत पाटण मतदार संघात एकूण ७२ % मतदान झाले होते. तर तेच मतदान २०१९ च्या निवडणुकीत ६७.७३ % मतदान झाले आहे. सरासरी हि टक्केवारी ६८ % आहे. हा घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पत्त्यावर पडणार हे गुरवारी होणाऱ्या निकालाअंती समोर येणार आहे. सद्यातरी शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास मतदारांना बोलून दाखवला असला तरी या निकालासाठी त्यांच्या मनात “धाकधूक” सुरू झाली आहे.

पाटण विधानसभा मतदार संघात एकुण २ लाख ९९ हजार ९२९, मतदारांपैकी २ लाख ०३ हजार १२९ मतदारांनी मतदान केले आहे. यापैकी पुरुष मतदारांची संख्या- १ लाख ०४ हजार ३१६ इतकी आहे. तर महिला मतदरांची संख्या- ९८ हजार ८१३ इतकी आहे. मागील विधानसभा निवडणूकीपेक्षा १५ हजार ५८७ पुरुष मतदरांची संख्या वाढली आहे. तर १० हजार ४९२ महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २०१४ साली ८८ हजार ७२९ पुरुष मतदारांनी मतदान केले होते. तर ८८ हजार ३२१ महिला मतदारांनी मतदान केले होते. एकुण मतदान – १ लाख ७७ हजार ०५० ऐवढे झाले होते. मागील निवडणूकीपेक्षा २६ हजार ०७९ जादा मतदारांनी मतदान केले असून या निवडणुकीत हि संख्या- २ लाख ०३ हजार १२९ ऐवढी आहे.

वरील सर्व आकडेवारी पहाता २०१९ विधानसभा निवडणूक कोणाच्या पत्त्यावर पडणार हि उत्सुकता मतदारांच्यात लागली आहे. असे असताना मल्हारपेठ, मारुल हवेली हे विभाग लोकसभेच्या मतदानाबरोबर आ. शंभुराज देसाई यांना किती साथ करेल याबरोबर मोरगिरी, तारळे, ढेबेवाडी हे विभाग देखील आ. देसाई यांना कीती तारणार तर कोयना, पाटण, चाफळ हे विभाग सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बाजूने किती उभे राहणार यावर निवडणूक अवलंबून राहिली असली तरी या निवडणूकीचा निकाल कुंभारगाव, तळमावले, काळगाव तर नव्याने जोडलेल्या तांबवे, सुपने या विभागाच्या निकालावर अवलंबून राहिला आहे.

मतदान झालेल्या EVM मशीन चोख पोलिस बंदोबस्तात सातारा येथे रवाना.

२६१ पाटण विधानसभा निवडणूक व ४५ सातारा लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूकीसाठी झालेले मतदान EVM मशीन पाटण येथून दुपारी १ वा. सुमारास चोख पोलीस बंदोबस्तात सातारा येथे नेण्यात आले आहे. या निवडणूकींचा निकाल गुरवार दि. २४ रोजी सकाळी ८ वा. पासून सुरू होणार असुन दुपारी २ वा. संपेल असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular