पाटण :- शेतात जाणारा रस्ता अडवून लाकडी दांडक्याने मारहाण करून स्वतः जवळील रिव्हॉल्वर बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिवशी बुद्रुक ता पाटण येथील संशयित आरोपी भरत आत्माराम पाटील याच्यासह चार जणाविरोधात पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान यापैकी जितेंद्र जयवंत सुर्यवंशी याला पाटण पोलिसांनी अटक केली असून भरत पाटील हा फरार आहे. दरम्यान या घटनेची फिर्याद पांडुरंग विठ्ठल सुर्यवंशी ( वय ५८) रा दिवशी बुद्रुक ता पाटण यांनी पाटण पोलीस ठाण्यात केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक १२ रोजी फिर्यादी पांडुरंग विठ्ठल सूर्यवंशी आणि त्यांचे चुलत भाऊ सदाशिव महादेव सूर्यवंशी हे सायंकाळी उभा पट्टा नावाच्या शिवारात गेले असता आपल्या शेतातील रस्त्यात दगड लावून रस्ता बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने तेथे उभे असलेल्या भरत पाटील यांना पांडुरंग सूर्यवंशी याने याचे कारण विचारले असता भरत आत्माराम पाटील व त्याच्या बरोबर असलेल्या इतर तिघांनी मिळून पांडुरंग सूर्यवंशी यांना शिवीगाळ केली तर भरत पाटील याने हातातील लाकडी दांडकाने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण केली तसेच आपल्या जवळील रिव्हॉल्वर बंदूक काढून पांडुरंग सूर्यवंशी यांच्या डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची पाटण पोलिसांत रविवारी रात्री उशिरा नोंद झाली असून पोलिसांनी आरोपी भरत आत्माराम पाटील यांच्यासाहित चौघांवर गुन्हा नोंद केला आहे.या घटनेतील दुसरा आरोपी जितेंद्र जयवंत सूर्यवंशी याला अटक केली आहे तर भरत पाटील फरार आहे तसेच अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.