पाटण :- कोकणात थैमान घालून गेलेल्या निसर्ग वादळामुळे जनजीवन उध्वस्त झाले असून अनेकांच्या संसाराची वाताहत झाली आहे. दापोली तालुक्यातही निसर्ग वादळामुळे मोठे नुकसान झाले असून आपदग्रस्त दापोली तालुक्यातील जनतेसाठी येथील आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्यावतीने मदत पाठविण्यात आली.
येथील रहिवासी तसेच आधार जनसेवा सामाजिक संस्थेचे सदस्य आणि दापोलीचे विद्यमान गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी निसर्ग वादळामुळे दापोली तालुक्याची झालेली वाताहत आणि उध्वस्त जनजीवनाचे भीषण वास्तव समाज माध्यमाद्वारे मांडून मदतीचे आवाहन केले होते. दापोली तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून काम करणाऱ्या आणि येथील भूमीपुत्र असणाऱ्या प्रशांत राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आधार संस्थेने निसर्ग वादळामुळे सर्वस्व गमावून बसलेल्या जनतेसाठीची मदत दापोलीकडे पाठवून दिली. सदर मदत गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी प्रांताधिकारी शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केली.संस्थेच्या या सामाजिक कार्याबद्दल प्रांताधिकारी शरद पवार यांनी धन्यवाद संस्थेला दिले.
याकामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. प्रकाश गायकवाड, अध्यक्ष अनिल मोहिते, सुनील क्षीरसागर, सोमनाथ अग्रे, सुरेश चव्हाण, नंदकुमार शेडगे, कुमार राजेशिर्के, पांडुरंग खैरमोडे, सुरेश कळके, शेखर धामणकर, सोमनाथ जंगम, रमेश पोतदार, कन्हैया घोणे, अनिल बनसोडे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले