पाटण:- पाटणचे सुपूत्र व सद्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर चे गटविकास अधिकारी प्रशांत जगन्नाथ राऊत यांची महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग मधील क्षेत्रिय स्तरावरील उत्कृष्ठ आणि गुणवंत अधिकारी या पुरस्कारासाठी राज्य शासनाने निवड केली आहे. या संदर्भात ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन परिपत्रक जारी झाले आहे. या पुरस्कारासाठी प्रशांत राऊत यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रशांत जगन्नाथ राऊत यांचे मूळगाव पाटण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. सुरवातीला साडेनऊ वर्षे पाटण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली आहे. पाटण तालुक्यात साडेतीन वर्षे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. १ वर्षे खामगाव जिल्हा बुलढाणा येथे पंचायत समिती मधे गटविकास अधिकारी यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे ४ वर्ष, चिपळूण येथे २ वर्ष आता गुहागर पंचायत समिती मधे गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार संभाळत आहेत. प्रशांत राऊत यांचा प्रमाणिक पणा व कामातील उत्कृष्ट कौशल्य याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग मधील क्षेत्रिय स्तरावरील उत्कृष्ठ आणि गुणवंत अधिकारी या पुरस्कारासाठी राज्य शासनाने निवड केल्याबद्दल माने-देशमुख विद्यालय पाटणच्या १९९३ च्या १० वीतील सर्व वर्गमित्रांनी, पाटण तालुका पत्रकार संघ, सुंदरगड संवर्धन समिती, हनुमान सेवा मंडळ च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.