पाटण:- ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त शुक्रवारी कोयना प्रकल्प ग्रस्त आंदोलनाच्या २५ व्या दिवशी प्रकल्पग्रस्त महिलांनी व्यासपीठाचा ताबा घेत दिवसभर सरकारवर ताशेरे ओढत. सरकारचा धिक्कार केला. आंदोलकांना मुख्यमंत्र्यासोबत बैठकीचा दिवस निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे या महिलांनी सांगितले. “समन्यायी विकास, सर्वांचा विकास” या सूत्रानुसार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्त जनता गेले २५ दिवस आपल्या न्यायिक हक्कासाठी कोयनानगर येथे ठिय्या आंदोलनास बसले आहेत. त्यामध्ये महिला आंदोलकांची संख्या लक्षणीय आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठकीचे निश्चित तारखेचे लेखी पत्र अजूनही न मिळाल्याने कोयना प्रकल्पग्रस्त जनतेत संतापाची लाट उसळली आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे तालुका कमिटीचे अध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष दाजी पाटील, सचिव महेश शेलार, संघटक सचिन कदम, श्रीपती माने व सर्व सदस्यांनी महिला दिना निमित्त सर्व प्रकल्पग्रस्त आंदोलक महिलांना शुभेच्छा दिल्या.
कोयनानगर ता पाटण येथे कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या टप्प्यातील बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून मुख्यमंत्र्यां सोबत निश्चित तारखेच लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही असा इशारा आज महिला दिनानिमित्त बोलताना प्रकल्पग्रस्त महिला भगिनींनी दिला आहे. कोयनानगर येथील गेले २५ दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग आहे. आपला संसार, मुले बाळे, गुरे ढेरे, घरदार सांभाळत या प्रकल्पग्रस्त भगीनी कोयनेच्या काठावर आपल्या न्याय हक्कासाठी अहोरात्र उन, वारा, थंडीची पर्वा न करता संघर्ष करत आहेत. शुक्रवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन या नवदुर्गांनी व्यासपीठाचा ताबा घेतला होता. दिवसभर आंदोलन स्थळी नारिश्तीचा यल्गार पहावयास मिळाला. आंदोलन गीते, गाणी, घोषणा, भाषणे करत मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठकीचे पत्र लवकर न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असा इशारा देत, या रणरागिणींनी सरकारच्या नावाने शिमगा करत आपल्या भाषणातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. व सरकारचा धिक्कार केला.
श्रमिक मुक्ती दलाचे वतीने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत सातारा जिल्ह्यातील कोयनानगर, वांग मराठवाडी, बामणोली सह राज्यातील ९ जिल्ह्यात धरणग्रस्त, अभयारण्यग्रस्त, दुष्काळग्रस्त जनता दि१२ फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलनास बसली आहेत,