
पाटण:- पाटण नगरपंचायतीने पाटण शहरातील नागरी वस्तीपासून जवळच असलेल्या पाटण स्पोर्टस क्लब स्टेडियम जवळ गेल्या वर्षभरापासून कचरा डेपो सुरू केला असल्याने या कचरा डेपोच्या दुर्गंधीने येथील रहिवाशी नागरीक हैराण झाले असून. तसेच कचरा डेपोच्या लगत असणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा कचरा डेपो बंद करण्यासाठी वेळोवेळी पाटण नगरपंचायतीला व प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र या मागणीवर पाटण नगरपंचायतीने अथवा शासकीय यंत्रणेने कोणतेच ठोस निर्णय आज पर्यंत घेतले नाहीत. येथील नागरिकांना केवळ वेळोवेळी फसविण्याचे काम केले आहे. पाटण नगरपंचायतीच्या व प्रशासकीय निंदनीय कारभारा विरोधात व पाटण स्पोर्ट्स क्लब शेजारील बेकायदेशीर सुरू असलेला कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी येथील शेतकरी रहिवाशी नागरीकांनी पाटण तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
पाटण नगरपंचायतीने बेकायदेशीर पाटण शहराजवळ सुरू केलेला कचरा डेपो बंद करणार नाहीत तोपर्यंत हे अमरण उपोषण सुरू राहील असे उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी सांगितले. उपोषण संदर्भात उपविभागीय कार्यालय उपविभाग पाटण, तहसीलदार पाटण, पोलिस स्टेशन पाटण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित कचरा डेपो हा बेकायदेशीर असून गेले वर्षभरापासून दांडगाईने कचरा टाकणे सुरु आहे. या कचरा डेपो मुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून येथील नागरीकांच्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर येथील शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसान पोहचले आहे. कचरा डेपो सुरु करण्यापूर्वी सभोवतालच्या शेतकऱ्यांची सहमती घेतलेली नाही. कचरा डेपो शेजारील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत विहिरी, ओढा, तलाव कूपनलिका या पाण्याला कचरा डेपोच्या प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. येथील रहिवाशांना देखील कचरा डेपो सुरू करण्यासाठी विश्वासात घेतले नाही. कचराडेपोतील कचऱ्याची योग्य विलेवाट न लावल्याने तो वेळोवेळी उघड्यावर जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात येथील वातावरण प्रदुषीत होत असून नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
उपोषण दरम्यान पाटण नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. सुशमा महाजन, नगरसेवक संजय चव्हाण, अजय कवडे, किरण पवार, प्राजक्ता भिसे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली असता आता पर्यंत पाटण नगरपंचायतीने कचरा डेपो बंद करण्याची दिलेली आश्वासने आमची फसवणूक करणारी ठरली असून आता कचरा डेपो बंद होत नाही तो पर्यंत हे अमरण उपोषण चालू ठेवणार असल्याचे उपोषणास बसलेल्या नागरिकांनी सांगितले. या निवेदनावर येथील शेतकरी नागरिक शिवाजी लुगडे, संजय शिंदे, सुशांत शिंदे, तुकाराम कदम , आकाश सांळुखे, प्रुथ्वीराज पवार, उदय कदम, रविंद्र कदम, प्रकाश सांळुखे, प्रताप कदम यांच्यासह आदी नागरीकांच्या सह्या असून या उपोषणास विक्रमबाबा पाटणकर, बाबुराव शिंदे, जनार्दन ऐर, नगरसेवक सागर माने, नाना पवार आदी नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.

