पाटण:- पाटण नगरपंचायतीचा कचरा डेपो बंद करण्याच्या मागणी साठी सुरु असलेल्या अमरण उपोषणाचा दुसऱ्या दिवशी उपोषण कर्ते शिवाजी लुगडे यांची तब्येत खालावली असताना त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय पाटण येथे उपचार सुरु करण्यात आले आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वा सुमारास उपोषण कर्ते शिवाजी लुगडे यांना चक्कर आली. या संदर्भात ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधला असता तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी खाजगी वैद्यकीय डॉक्टर विलास साठे यांच्याकडून शिवाजी लुगडे यांची तपासणी करण्यात आली. असता त्यांनी लुगडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र सायंकाळी ५ वा. पर्यंत कोणीही शासकीय जबाबदार अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट दिली नाही.
पाटण नगरपंचायतीने बेकायदेशीर पाटण शहराजवळ सुरू केलेला कचरा डेपो बंद करणार नाहीत तोपर्यंत हे अमरण उपोषण सुरू राहील असे उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी सांगितले. हा आमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी लढा सुरु आहे. जिथे कचरा डेपो सुरु आहे. तेथील अजुबाजूच्या शेतकऱ्यांचा सहमती परवाना नघेता सुरू केलेला कचरा डेपो हा बेकायदेशीर असुन या कचरा डेपोचा एक वर्षाचा करार मागील महिन्यात संपला असताना देखील दंडीलशाहीने नगरपंचायतीने कचरा डेपो सुरु ठेवला आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना व शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. काही अधिकारी, व नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या मते उपोषणला बसणे बेकायदेशीर आहे. या मंडळींना उपोषण कर्त्यांचे एकच सांगणे आहे. आमचे उपोषण बेकायदेशीर असेल तर पाटण नगरपंचायतीचा कचरा डेपो कायदेशीर आहे का ते दाखवा. नाहीतर दंडीलशाहीने बेकायदेशीर कचरा डेपो सुरु ठेवण्यास भाग पाडणाऱ्या संबधितावर फौजदारी गुन्हे दाखल करा. अशी मागणी दुसऱ्या दिवशी उपोषण कर्त्यांनी केली.
पाटण नगरपंचायतीने पाटण शहरातील नागरी वस्तीपासून जवळच असलेल्या पाटण स्पोर्टस क्लब स्टेडियम जवळ गेल्या वर्षभरापासून कचरा डेपो सुरू केला असल्याने या कचरा डेपोच्या दुर्गंधीने येथील रहिवाशी नागरीक हैराण झाले आहेत. तसेच कचरा डेपोच्या लगत असणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा कचरा डेपो बंद करण्याची मागणी उपोषण कर्त्यांची आहे. आता पर्यंत पाटण नगरपंचायतीने कचरा डेपो बंद करण्याची दिलेली आश्वासने आमची फसवणूक करणारी ठरली आहेत. आता कचरा डेपो बंद होत नाही तो पर्यंत हे अमरण उपोषण चालू ठेवणार असल्याचे उपोषणास बसलेल्या नागरिकांनी सांगितले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी लुगडे, संजय शिंदे, सुशांत शिंदे, तुकाराम कदम , जंगम गुरुजी, योगेश घाडगे, संजय भोज, आकाश सांळुखे, प्रुथ्वी राज पवार, उदय कदम, शुभम सोनावले, अनमोल पाटील, संकेत महाडिक, सागर देवकांत, तेजस गायकवाड, रविंद्र कदम, प्रकाश सांळुखे, प्रताप कदम, बाबुराव शिंदे, जनार्दन ऐर, नगरसेवक सागर माने, नितीन पिसाळ, सुरेश पाटील, राजाभाऊ काळे, नाना पवार, शंकरराव कुंभार, फत्तेसिंह पाटणकर आदी नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.