पाटण: युतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेमधून मी आज निवडणूक लढवत आहे. पाच वर्षामध्ये काय काय झाले हे सर्वांना माहिती आहे. मोदी साहेबांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. लोकसभेच्या निवडणूकीला जिल्हा स्तरावरील विकास महत्वाचा असतो. 10 वर्षात कधी कोणत्याही तालुक्याला भेट दिली नाही. असे लोक आम्ही सातारा मिसळ खाल्यानंतर जिल्हाभर पळायला लागले आहेत. आत्ता मतदार राजा आहे निवडणूकिनंतर ते राजा असतात. हे चित्र बदलून मतदारांना नेहमीच राजा ठेवायचे आहे. लोकसभेचा फॉर्म 30 तारखेला मी भरणार आहे. माझा तालुका हा इतरांपेक्षा जास्त मदत करणार हा माझा विश्वास आहे. युती चा संकल्प पूर्णत्वास नेण्याचे काम सर्वसामान्य नागरिकांनी करावे. असे अहवान नरेंद्र पाटील यांनी नवारस्ता येथे केले.
सातारा लोकसभेचे शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांची प्रमुख कार्यकर्तेची बैठक नाडे नवारस्ता येथील कृष्ण लीला मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी नरेंद्र पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन भानुगडे-पाटील, आमदार शंभूराज देसाई, शिवसेनेचे पुरूषोत्तम जाधव, प्राणा फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, अॅड. डि पी जाधव, अशोकराव पाटील, भरत साळुंखे, भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कविता कचरे, उपजिल्हाध्यक्षा आयेशा सय्यद, भाजप तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले सातारा लोकसभा मतदार संघात पंधरा वर्षाच्या कारकिर्दित खोटी चिल्लरचं आली. लोकसभेचा उमेदवार हा पाटण तालुक्यातील आहे. राष्ट्रवादीच्या कारकिर्दिमध्ये राज्यामध्ये सगळे घोटाळेच झालेले आहेत. आमच्यावरती बोलणार्यांनी अगोदर स्वतःकडे पाहिले पाहिजे. युती होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यामध्ये घातले. ठोस निर्णय घेणारे, खंबीर नेतृत्व असणारे नरेंद्र मोदी यांना निवडूण द्या व जिल्ह्यातून ही नरेंद्र चं होऊदयात असे अहवान त्यांनी केले. आ.शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेमध्ये नरेंद्र पाटील यांची उमेदवारी जाहिर झाली. पाटण मतदार संघामध्ये जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडायची आहे. यापूर्वी घडलेल्या गोष्टींवरती बोलायची ही वेळ नाही. केंद्रीय नेत्यांनी युतीचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचा प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि पुन्हा एकदा युतीने आपली शक्ती दाखवून दिली. पाटण तालुक्यातील विकासाची संकल्पना युतीच्या माध्यमातून झालेली आहे. साडेचार वर्षामध्ये भरपूर विकास केलेला आहे. तालुक्यातील सुपुत्राला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. घरचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचा आहे. युती म्हणुन आपण या निवडणूकीला सामोरे जायचे आहे. प्रयत्नांची पराकाष्टा करून आपणास जास्तीत जास्त मत भेटतील असा प्रयत्न करु.
पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये, पाटण तालुक्याला मोठी संधी मिळालेली आहे. पाटणला खासदार दहा वर्षात फिरकले नाहीत. आत्ता तुम्हाला संधी आहे. त्याचं तुम्ही सोनं करा. तुमच्या भूमिपूत्राला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जि प सदस्य विजय पवार यांनी केले. तर शेवटी आभार शिवसेना पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी मानले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने भाजप – शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
छ. शिवेंद्रराजे यांच्याबरोबर मिसळ खाल्ली तर काही जण 10 वर्षात पहिल्यांदा पळायला लागले: नरेंद्र पाटील
RELATED ARTICLES