पाटण:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाणीतून नामकरण झालेला सुंदरगड व गडाचा परिसर पहाताना सुंदरतेचा “सुंदरगड” असल्याची अनुभूती आली. गडावरील दंतगिरी, वीर हनुमान, तलवार विहीरीतील सुंदरेश्र्वराचे दर्शन घेतांना हा किल्ला किती कल्पकतेने इतिहासातील शिल्पकलाकारांनी साकारला. या कलाकारांच्या कामाचे कौतुक करून सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीच्या सदस्यांनी श्रमदानातून गडाचे राखलेले इतिहास वैभव कौतुकाचे आहे. शिवरायांच्या गड-किल्ल्यासांठी आता शासनाच्या मदतीची वाट न पहाता छत्रपती शिवतरुणांनी पुढे येऊन आप-आपल्या परिसरातील गड-किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे तरच पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज समजतील. असे छत्रपती संभाजी महाराज स्मृती संस्थान वडू बुद्रुकचे सचिव छत्रपती शिव अभ्यासक मिलिंद एकबोटे यांनी सुंदरगडाला दिलेल्या भेटी प्रसंगी सांगितले.
यावेळी छत्रपती शिव मोहीम भारत भ्रमण संस्थापक महिंद गुरूजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंगणवाडीला (चाफळ) येथे सोमवार दि. १३ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज- समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रथम भेट दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पाटण येथे मिलिंद एकबोटे, महिंद गुरुजी आले असता त्यांनी सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीच्या मावळ्यांसोबत सुंदरगड भ्रमंती केली यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले संवर्धन समितीच्या मावळ्यांकडून सुंदरगड जाणून घेताना किल्ल्याचा इतिहासिक ठेवा आजच्या पिढीकडून जतन होत आहे. याचे समाधान वाटले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी जिवणाच्या खडतर प्रवासात मराठी सम्राज्य उभे केले. हे सम्राज्य उभे करताना मराठी सैन्याबरोबर सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांनी धैर्य आणि मोठे पाठबळ दिले. म्हणूनच महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा ठेवा आजच्या तरुणांनी जपला पाहिजे. तरच छत्रपतींचा इतिहास पुढील पिढीला अभ्यासता येईल. असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिंद गुरुजी म्हणाले. पाटण हि इतिहासिक भूमी आहे. या तालुक्यात अनेक इतिहासिक ठेवा जतन झाला आहे. याची साक्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची शिंगणवाडी (चाफळ) येथे झालेली प्रथम भेटीचे ठिकाण होय. प्रथम भेट दिनानिमित्त शिंगणवाडी येथे सोमवार दि. १३ मे रोजी होणारा पालखी सोहळा या भेटीचा इतिहास जागा करतो. म्हणूनच प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या या सोहळ्यात छत्रपती शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे अहवान त्यांनी केले. यावेळी सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीचे मावळे शंकरराव कुंभार, काशिनाथ विभुत्ते, यशवंतराव जगताप, महादेव खैरमोडे, मनोहर यादव, यसुफ हकिम, शंकर मोहिते, निलेश फुटाणे, लक्ष्मण चव्हाण, अनिल बोधे, अनिस चाऊस, अविनाश पराडकर, विशाल निकम, महेश पवार यांच्यासह शिवमावळ्यांची उपस्थिती होती.