पाटण : – कराड-चिपळूण रस्ता रूंदीकरणाच्या कामावेळी काळोली परिसरात पाटण शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन एल अँड टी कंपनीच्या जी.सी.बी कडून बुधवारी दुपारी पुन्हा फुटल्याने पाटण शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. रस्त्याच्या कामाबाबतीत ठेकेदाराचा चाललेल्या हालगर्जी पणामुळे पाटण शहराला गेले तीन ते चार दिवस पाणी पुरवठा होऊ शकला नाही. याला जबाबदार धरून एल अँड टी कंपनी आणि ठेकेदार यांच्यावर पाटण नगरपंचायतीने पाटण पोलिसांत तक्रार दिली असुन पोलिसांनी कंपनी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कंपनीच्या चाललेल्या या मनमानी कामाचा मनस्ताप पाटण नगरपंचायतीला व शहरातील नागरिकांना होत असल्याने नगरपंचायतीचे नगरसेवक व नागरिकांनी कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त करुन कराड-चिपळूण रस्त्यावर रस्ता रोखो करण्याचा प्रयत्न केला होता. घटनास्थळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी भेट देवून पाहणी केली व लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी नगरसेवकांना दिल्या.
कराड – चिपळूण रस्ता रुदींच्या कामात पाटण शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने नागरिकांनी कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. पाटण शहराचा अजून दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होवू शकणार नाही. त्यामुळे हाकेच्या अंतरावर कोयना काठावरील पाटण शहरातील नागरीकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
कराड-चिपळूण रस्ता रूंदीकरणाच्या कामावेळी तामकडे गावानजीक आयटीआय प्रशिक्षण केंद्राजवळ सोमवार दि. २७ रोजी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष, नगरसेवक व एल अँड टी कंपनीचे कर्मचाऱ्यांच्यामध्ये शाब्दीक चमकम झाली होती. त्यावेळी पाटणचे सपोनि यु. एस. भापकर यांनी मध्यस्ती करून वाद मिटवला होता. त्यानंतर पाटण नगरपंचायतीची उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक संजय चव्हाण, अजय कवडे यांनी रात्रभर जागून पाईपलाईन दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला होता. मात्र बुधवार दि. २९ रोजी दुपारी ४ वाजता पुन्हा एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे पाण्याचे लांबच्या लांब फवारे उडत होते. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ग्रामस्थ व नगरपंचायतीचे नगरसेवक आक्रमक झाले होते. यावेळी नगरपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कंपनीचे कर्मचारी यांच्यातील वाद विकोपाला जावू नये म्हणून पाटण पोलीस ठाण्याचे सपोनि भापकर यांनी मध्यस्ती करून वादर मिटविला. त्यानंतर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी घटनास्थळी भेट देवून नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लवकरात लवकर पाईपलाईनची दुरूस्ती करून पाटण शहरातील नागरीकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना केल्या. यावेळी नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेविका सरस्वती खैरमोडे, योगिता कुंभार, किरण पवार, अजय कवडे, सचिन कुंभार, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
एल अँड टी कंपनी आणि ठेकेदार यांच्या हालगर्जी पणामुळे वारंवार रस्ता रुदींच्या कामात पाटण शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटत असल्याने पाटण नगरपंचायतीचे कर्मचारी चंद्रकांत मारुती मोरे यांनी एल अँड टी कंपनी आणि ठेकेदार तानाजी गणपतराव लोहार यांच्या विरोधात पाटण पोलिसांत तक्रार दिली असुन पाटण पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला आहे. या कामी अधिक तपास पो.नि. उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. गायकवाड करत आहेत.