पाटण:- कराड-चिपळूण महामार्गाच्या रूंदीकरणाचा ठेका घेतलेल्या एल अँड टी कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कराड-पाटण ते कोयनानगरपर्यंतच्या महामार्गाची बिकट दुरवस्था झाली आहे. मार्गावरील चिखलाचे साम्राज्य, मोठमोठे खड्डे याचा नाहक त्रास प्रवासी व कोयना पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांना बसत आहे. याकडे कंपनीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून प्रशासनाने कंपनीला सूचना कराव्यात. येत्या दहा दिवसात कंपनीने वाहतुकीसाठी योग्य रस्ता न केल्यास पाटण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच्या स्टाइलने आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी तहसीलदार रामहरी भोसले यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, कराड ते चिपळूण या रस्ता रूंदीकरणाचे काम एल. अँड. टी. प्रा. लि. या कंपनीकडे आहे. कराड ते पाटण व पाटण ते कोयनानगर या मार्गाचे काम सध्या रेंगाळले असून नियोजन शून्य भोंगळ कारभारामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित कंपनीचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तो तातडीने द्यावा. महामार्गाची कोणती तरी एक बाजू वाहतुकीसाठी सुरळीत करावी. मार्गावरील रस्त्याच्या बाजूला लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध असलेले पिकअप शेड ठेकेदाराने उद्वस्त केले आहे. सध्या पावसाळा असून त्यामुळे शालेय विद्यार्थी व लोकांची गैरसोय होत आहे. रूंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहचली असून ज्या ठिकाणी रस्त्याचे काम झाले आहे. त्याच्या दुतर्फा तातडीने झाडे लावावीत.
रस्त्याचे काम करताना कंपनीच्या ठेकेदारामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पिण्याच्या व अन्य पाण्याच्या पाईप फुटल्या असून लोकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे. त्या तातडीने बदलून द्याव्यात. महामार्गाचे काम सुरू असताना सुरक्षित उपाय न केल्याने झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर काही जखमीही झाले आहेत. सुरक्षिततेच्यादृष्टीने एल अँड टी कंपनीने स्वत:च्या टोल फ्री क्रमांकांवर शासनाने उपलब्ध केलेल्या 108 सारख्या सुविधा देणाऱ्या ऍम्ब्युलन्स गाड्या त्वरित उपलब्ध कराव्यात. जेणेकरून अपघात घडल्यास जीवितहानी होणार नाही. कामाच्या ठिकाणी कंपनीने स्ट्रीट लाईट, लाईट रिफलेक्टर, बॅरिकेट्स, इलेक्ट्रिकल दिशादर्शक तातडीने लावावेत. साईडपट्ट्या मार्गावर चिखलामुळे अनेक गाड्या घसरून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. साईडपट्टीवर डांबरीकरण करावे.
वरील मागण्यांच्या संदर्भात प्रशासाने गांभिर्याने लक्ष देवून संबंधित एल. अँड. टी. कंपनीला कार्यवाहीबाबत कडक सूचना द्याव्यात. या उपरही सदर कंपनीने कार्यवाही करण्यास टाळाटाळ केल्यास एल. अँड. टी. कंपनीच्या विरोधात पाटण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या नेहमीच्या स्टाइलने आंदोलन करेल. यादरम्यान, होणाऱ्या नुकसानीस स्वतः कंपनी व ठेकेदार जबाबदार असेल, असा इशारा देवून जनसामान्यांच्या प्रश्नाकरिता आंदोलन करण्याची गरज भासणार नाही आणि आपण या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणीही निवेदनात शेवटी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, पोलीस निरीक्षक पाटण, एल. अँड. टी कंपनी, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय कोल्हापूर व सातारा यांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष विकास पवार, तालुका उपाध्यक्ष संजय सत्रे, वाहतूक सेनाध्यक्ष राहूल संकपाळ, कराड तालुकाध्यक्ष दादा शिंगण, पाटण शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, म्होप्रे विभाग अध्यक्ष संभाजी चव्हाण, कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे, मरळी विभाग अध्यक्ष हणमंत पवार आदी पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.