पाटण :- 261 पाटण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. 397 मतदान केंद्रासाठी 2 हजार 488 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराला छायाचित्र असणारे 11 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. जनतेने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचार संहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
यावेळी तहसीलदार रविंद्र माने, नायब तहसीलदार बजरंग चौगुले, मंडल अधिकारी पी. एच. शिंदे, निवडणूक कर्मचारी शकील मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे माहिती देताना पुढे म्हणाले, 261 पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 397 मतदान केंद्रे आहेत. मतदारसंघात 1 लाख 51 हजार 297 पुरूष मतदार आणि 1 लाख 48 हजार 538 महिला व तृतीयपंथी 1 मतदार असे एकूण 2 लाख 99 हजार 836 मतदार आहेत. त्यापैकी 1 हजार 498 दिव्यांग मतदार आहेत. त्यामध्ये 758 सैनिक मतदार यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नवीन मतदारांनी आपली नामनिर्देशनपत्र भरून दिली आहेत. अशा मतदारांची यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
तालुक्यामध्ये एकूण 397 मतदान केंद्रापैकी 9 शहरी व 388 ग्रामीण मतदान केंद्र आहेत. निवडणूककामी क्षेत्रीय अधिकारी 48, राखीव क्षेत्रीय अधिकारी 12 असे एकूण 60 अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 497 केंद्राध्यक्ष, 497 सहाय्यक केंद्राध्यक्ष, 1 हजार 494 सहाय्यक, शिपाई व पोलीस कर्मचारी असे एकूण 2 हजार 488 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे सर्व कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. तसेच बीएलओ, आशा सेविका व स्वयंसेवक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रांवर आशा सेविकांमार्फत औषधांचे कीट उपलब्ध करण्यात आले आहेत. लहान बाळासह मतदानासाठी आलेल्या स्त्री मतदारांना अंगणवाडी सेविकेमार्फत पाळणा घराची सोय करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी 5 भरारी पथके, 4 स्थिर (तळमावले, निसरे, कोयनानगर, तारळे), व्हिडीओ सर्विलन्स 3, व्हिडीओ, व्हीव्हीग 1,खर्च पथक 1 अशा एकूण 14 पथकांची नेमणूक केली आहे. 1 हजार 498 अपंग मतदारांसाठी ऍटोरिक्षांची सोय करण्यात आली असून 221 व्हिल चेअरची सोय केली आहे.
मतदान करताना मतदाराला 11 छायाचित्र असणारे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, शासनाचे कार्ड, बॅंक पासबूक, पॅनकार्ड, आधारकार्ड, स्मार्ट कार्ड, मनेरेगा (रोजगार) कार्ड, हेल्थ कार्ड, इन्श्युरन्स कार्ड, पेन्शन कार्ड या ओळखीच्या पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती देवून निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचार संहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. याबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता 3 प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे श्रीरंग तांबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.