Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीपाटणमध्ये आ. शंभुराज देसाई यांच्यासह 13 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल

पाटणमध्ये आ. शंभुराज देसाई यांच्यासह 13 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल

पाटण: पाटण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 9 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ. शंभूराज देसाई यांच्यासह अन्य पक्ष, संघटना व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी एकूण 13 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून येथील तहसील कार्यालय निवडणूक विभागात होणार आहे. तर सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेणार्‍या उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेता येतील. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र माने यांनी दिली.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी येथे मान्यवर नेते व पदाधिकारी यांचेसमवेत महायुतीचे उमेदवार आ. शंभूराज देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे भरत पाटील, आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते. कोणत्याही मोठ्या शक्तीप्रदर्शनाशिवाय आ. देसाई यांनीही साध्या पद्धतीने आपला अर्ज दाखल केला.
याशिवाय अपक्ष म्हणून सुरेश राजाराम संकपाळ, अजीतकुमार दिनकरराव मोहिते, सुभाष तानाजी देसाई, सागर लक्ष्मण जाधव, विजयकुमार मारूती सुर्वे, प्रकाश सदाशिवराव पवार यांनी तर वंचित बहुजन आघाडीतून अशोकराव तातोबा देवकांत, स्वराज्य सेना (महाराष्ट्र) यांच्याकडून सयाजीराव दामोदर खामकर यांनी नव्याने अर्ज दाखल केले.
दरम्यान यापूर्वी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार सत्यजीतसिंह विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह ब. स. पा. च्या शिवाजी भिकाजी कांबळे यांनीही शुक्रवारी पुन्हा अर्ज दाखल केले. या उमेदवारांसह भा. ज. प. चे बंडखोर उमेदवार तथा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक बंडू महाडीक, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून शरद हणमंत एकावडे यांनी यापुर्वी आपले अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीसाठी आता सेना-भाजप महायुती, राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेस मित्र पक्ष आघाडी, बसपा, संभाजी ब्रिगेड पार्टी, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य सेना अशा पक्ष संघटनांच्या सहा उमेदवारांनी एकूण तेरा तर सात अपक्षांचे सात अशा एकूण 13 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी या अर्जांची शासकीय छाननी सकाळी 11 वाजल्यापासून येथील तहसील कार्यालयात होणार आहे. तर सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेता येणार असल्याचे श्रीरंग तांबे व रविंद्र माने यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या निवडणुकीत प्रमुख लढतीचे उमेदवार म्हणून महायुतीचे आ. शंभूराज देसाई तर महाआघाडीचे सत्यजीतसिंह पाटणकर यांच्यातच खरी लढत आहे. अन्य पक्ष, संघटना व अपक्ष उमेदवार यापैकी कोणाचे अर्ज वैध, अवैध ठरणार यासह यापैकी कोण कोण आपले अर्ज सोमवारी माघारी घेणार यानंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कोण कोण उतरणार हे महत्वाचे आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर उरलेल्या उमेदवारात आ. देसाई व पाटणकर यांना कोण तारक व कोण मारक या बाबीही काही प्रमाणात स्पष्ट होतील.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular