फलटण: क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली असून एस. टी. पूर्वेकडील गेट बंद असल्याने त्यामध्ये भर पडली आहे. एस. टी. प्रशासन मात्र त्याची दखल घेत नसल्याने लहान मोठ्या वाहनांसह दुचाकी स्वार, पादचारी, वृद्ध नागरिक या सर्वांचीच कुचंबना होत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी होत आहे.
एस. टी. बस स्थानकाच्या काँक्रीटीकरण कामासाठी महामंडळाने मोठा निधी उपलब्ध करुन देऊन त्यासाठी ठेकेदार निश्चित करुन वर्क ऑर्डर ही दिली आहे, मात्र बस स्थानक परिसरातील पाण्याचा तसेच आगारातील बसेस धुण्याच्या रॅम्पमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व पुरेशी व्यवस्था अगोदर करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्याची पूर्तता झाली नसल्याने दोन्ही कामे रखडली असल्याचे समजते परिणामी बस स्थानकावर प्रचंड चिखलाचे व पावसाचे साठलेल्या पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामधून बस मध्ये जाणे किंवा बस मधून उतरुन बस स्थानकापर्यंत जाताना प्रवाशांची विशेषतः वृद्ध, महिला, लहान मुले, अपंग यांचे अतोनात हाल होत आहेत, मात्र एस. टी. प्रशासनाला त्याची ना खंत, ना खेद अशी अवस्था झाली आहे.
दिवाळी सणासाठी गावाकडे आलेले पुण्या – मुंबईचे चाकरमानी, भाऊबीजेसाठी आलेल्या बहिणी व त्यांची कुटुंबे शाळांच्या सुट्या संपल्याने आपल्या गावाकडे किंवा नोकरीच्या ठिकाणी निघाल्याने सध्या एस. टी. बस स्थानकावर त्याचप्रमाणे खाजगी बसेस आणि स्वतःच्या वाहनाने जाणार्यांची संख्या मोठी असल्याने सर्वच रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असलेल्या फलटण बस स्थानक परिसर आणि क्रांतिसिंह नाना पाटील चौकात तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
फलटण नगर परिषद आणि शहर पोलीस ठाणे यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन चौकातील अतिक्रमणे दूर करण्याबरोबर चौकापासून चारही दिशांना सुमारे 500 मीटर पर्यंत कोणतेही वाहन, रिक्षा, वडाप, हातगाडे उभे राहणार नाहीत यासाठी विशेष दक्षता घ्यावी तसेच एस. टी. प्रशासनाने बस स्थानकातील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था तातडीने पूर्ण करुन, बस स्थानकाचे काँक्रिटीकरण लवकर पूर्ण करावे अशी मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.
शहरातील बाजार पेठेतही वाहतुकीची समस्या जवळपास सर्वच ठिकाणी जाणवत असून त्यावर योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणांनी विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील वाहतूक कोंडी त्वरित दूर करा
RELATED ARTICLES