Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीयावर्षीही वारकर्‍यांचा प्रवास साठलेल्या पाण्यातून व चिखलातूनच..

यावर्षीही वारकर्‍यांचा प्रवास साठलेल्या पाण्यातून व चिखलातूनच..

फलटण (अशोक भोसले) : श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये गेली अनेक वर्ष तरडगाव येथील अर्धवट असलेला उड्डाण पुल व रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाला अपयश आल्याने तरडगाव येथील पालखी मार्गावरील अतिक्रमण व पुर्नवसन करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने यावर्षीही लाखो भाविक वारकर्‍यांना तेथील साठलेल्या पाण्यातुन व चिखलातुन आपला प्रवास करावा लागणार आहे यामुळे वारीतील अडचणी वाढणार असुन याठिकाणी अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रति वर्षाप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीला लाखो वारकरी मार्गस्थ होत असताना काळज येथील वन विभागाच्या लालफितातीत अडकलेला मार्ग त्यामधील पडलेली खडी, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाड़े, रस्त्याच्या कडेची धोकादायक साईडपट्टी, नसलेले दिशादर्शक फलक व व्यावसायिकांनी विना परवाना फोडलेले दुभाजक त्यामधील उगवलेली काटेरी व इतर झाडे झुडपे याचबरोबर आपली वडिलोपार्जित मालमत्ता असल्याप्रमाणे त्या दुभाजकामध्ये विना परवाना छोटे – मोठे व्यवसायाचे फलक अपघाताला निमंत्रण देत असुन त्या लावलेल्या विनापरवाना फलकावर व संबंधितांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे होत आसलेले दुर्लक्ष व सुरु असलेली व्यावसायिकांची मुजोरी या मार्गावर खुप मोठी अडथळा असल्याची भावना ग्रामस्थ व वाहन चालकांमधुन होत आहे.
याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये माऊलींचा सोहळा विसावण्यासाठी व आळंदी ते पंढरपूर मार्गावरील पहिले उभे रिंगण होत असलेल्या चांदोबा लिंब येथील मंदिराचा प्रश्न अजुन सुटत नसल्याने याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे पुर्व व सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग चांदबाबा लिंब मंदीर समिती व ग्रामस्थ तसेच आळंदी देवस्थान ट्रस्ट यांच्यातील समन्वयक यांनी दोन पावले पुढे टाकीत हा तिढा सुटावा अशी अपेक्षा वारकरी भाविक भक्तांमधुन होत आहे.
सर्देचा ओढा (कापडगाव,ता.फलटण) येथे फलटण तालुक्याच्या वतीने श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते.माञ याठिकाणाहुन ते पुर्ण मार्गावर झालेल्या पावसाने छोटे मोठे पाण्याची डपकी साठली असुन यामुळे डासांचे साम्राज्य पसरले असुन डपकी आजाराला निमंत्रण देत आहेत.तसेच झालेल्या चिखलामुळे वारकर्यांना या चिखलाचा सामना करावा लागत आहे. तरडगांवचा उड्डाण पूल हा पालखी मार्गातील सर्वात मोठा अडथळा असून लोणंद फलटण रस्त्यावर असलेल्या तरडगावला सध्या मध्यभागी अडचणीत अडकून पडलेला उड्डाण पुल प्रशासनाच्या अनास्थेमुळे आज वर अपूर्ण व धोकादायक पध्दतीने तसाच आहे या पुलाच्या दोन्ही बाजूला गाव व शाळा असल्याने शाळकरी लहान मुले मूली विद्यार्थी वयोवृद्ध माणसे स्त्रीया यांची हिकडे तिकडे ये जा होत आहे. अनेक जणांना या पुलाचा वापर झेंडे विविध कार्यक्रमाचे फ्लेक्स लावण्यासाठी तसेच व्यावसायिकांसाठी गाडी पार्किंगसाठी करत आहेत.
दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि वारकरी यांची पायी दिंडी तरडगाव मार्गे जात असते कोटयवधीं रुपयांचा खर्च करुण आजही हा उड्डाण पूल अर्धवट स्वरुपात आहे. या वर्षी पोलिस प्रशासनाने अवतीभवती ये जा करणार्‍या भाविकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पुलाच्या अवती भवती चारीबाजूने चांगला बंदोबस्त ठेवाव लागणार आहे. गेल्या वर्षी मुख्य रस्त्यावरुन गाड्या आतील भागातुन वळवुन पुन्हा मुख्य रस्त्याला घेऊन जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली होती. किमान पुढील वर्षी पालखी मार्गात असलेला अर्धवट अवस्थेतील पूल पूर्ण तरी करावा काढून तरी टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा अशी अपेक्षा तरडगाव ग्रामस्थ करीत आहेत.
निंभोरे येथील अपुर्ण अवस्थेत असणारे रस्त्याचे व पुलाच्या कामामुळे छोटे मोठे अपघात घडलेले असतानाही हा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित असुन छोटा पाऊस आला तरी या ओढ्याला पाणी येते यामुळे पुणे पंढरपूर मार्गावर वाहतुक ठप्प होऊन अनेकवेळा हा मार्ग बंद होतो.यामुळे याठिकाणच्या रस्ता व ओढ्याचे काम अपुर्णच आहे.तसेच याच ठिकाणी दुभाजकावरील काटेरी झुडपे वाढल्याने ही झुडपे आसपासचे पडलेले खड्डे,साठलेले पाणी,चिखल,अपुर्ण राहिलेले दुभाजकाचे काम यामुळे वारकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रति वर्षाप्रमाणे वडजल,ता.फलटण येथील न्याहारी आळंदी येथील चोपदारांनी रद्द केल्याने ती न्याहारी पुढे फरांदवाडी येथील हद्दीत फलटण दुध संघाच्या परिसरात होणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानने दिली असल्याचे पुढे येत आहे.माञ याठिकाणी तशी व्यवस्था होण्यासारखी नाही.यामुळे हा न्याहारीच्या ठिकाणच्या प्रश्नावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
फलटण नगर पालिकेची हद्द सुरु होते रस्त्याचे अपुरे काम शिरवळ बारामती रखडलेला मार्ग शहराला व बारामती रोडला मिळणारा पर्यायी रिंग रोड याची न झालेली पुर्तता व न निघालेला तोडगा जिंती नाक्यावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला लागलेला ब्रेक तसेच शहरातील सगुणामातानगर (मलटण) सिध्दीविनायक मार्गावर वाढलेले अतिक्रमण,जुन्या गटावरील तुटलेली झाकणे,नविन सुरु असलेल्या भुटारी गटाराचे अपुर्ण काम त्यासाठी टाकलेल्या मोठ्या पाईप,त्यावरील ढकलेली माती पावसाने रस्त्यावर येऊन झालेले चिखलाचे साम्राज्य यामुळे झालेले चिखलमय रस्ते अपघाताला निमंत्रण देत असुन याकडे झालेले नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष,भुयारी गटारामुळे उखडलेले रस्ते यावर पडलेले मोठ मोठे खड्डे,तुटलेले गतीरोधक यामुळे पालखी मार्ग समस्यांचे आगार बनले असुन यंदा वारकरी भाविकांनी खुप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
फलटण शहराच्या मध्यवर्ती भागातुन जात असलेल्या पालखी मार्गावरुन बाणगंगा नदीची झालेली गटारगंगा आरोग्याला धोकादायक झाली असुन या नदीची कोणतीही स्वच्छता न झाल्याने डासांचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच पाचबत्ती चौकातुन पालखी मार्गावर दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण,रस्त्यावर असलेले माहाकाय खड्डे त्यामध्ये साठलेले पाणी त्याचबरोबर रखडलेले त्या भागातील रस्त्याचे रखडलेले काम,गटाराचे रखडलेले काम यामुळे हा मार्ग खडतर झाला असुन या मार्गावर पालखी सोहळ्यातील भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांधकाम विभाग (प्रशासकीय इमारत) शेजारी पालखी मार्गावर उखडलेला रस्ता,साठलेल्या पाण्याची डपकी त्यावरील डासांचे साम्राज्य,कॉलनी शेजारील घाणीचे साम्राज्य,उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या निवासस्थाना समोरील असलेला रस्ता गेली अनेक वर्ष तसाचा तसाच असल्याने हा रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात अशी अवस्था झाली असुन या रस्त्याची मालकी नक्की कोणाची ? या वादामुळे गेली वीस वर्ष या रस्त्यावर पाटीही पडली नाही.यामुळे या मार्गावर वारकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ज्याठिकाणी संत माऊलींच्या पालखीचा विसावा असतो त्याठिकाणी पावसामुळे अनेक डपकी साठली असुन पुर्वेला कचरा मोठ्या प्रमाणात तसाच आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular